US Airstrikes Iran : इस्रायल-इराणमधील संघर्षात आणखी वाढ झाली असून इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. या दोन्ही देशातील संघर्षात आता अमेरिकेचीही एन्ट्री झाली. अमेरिकेने इराणवर आज (२२ जून) मोठे हवाई हल्ले केले. तसेच इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करत ते नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करताना नेमकं कशाचा वापर केला? अमेरिकेला हा हल्ला करण्यासाठी किती कालावधी लागला? अमेरिकेने हवाई हल्ले करताना इराणने प्रत्युत्तर दिलं नाही का? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. मात्र, यावर आता या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संयुक्त चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ कंस पार पडलं?

दरम्यान, अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रावर केलेल्या हल्ल्यांना ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ असं सांकेतिक नाव देण्यात आलं होतं. या ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’च्या माध्यमातून इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये १२५ हून अधिक विमाने, ७ बी-२ बॉम्बर्स, १२५ जेट विमाने, १३ हजार किलो वजनाचे डझनभर बॉम्बचा समावेश होता. तसेच इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ला करण्यासाठी एकूण २५ मिनिट लागल्याची माहिती चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी दिली आहे.

हल्ल्यादरम्यान इराणने अमेरिकेवर हल्ला केला का?

अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ल्याचं ऑपरेशन २५ मिनिटांत पूर्ण झाल. तसेच या संपूर्ण २५ मिनिटांच्या ऑपरेशन दरम्यान इराणी हवाई संरक्षण प्रणालींनी कोणत्याही अमेरिकन लष्करी मालमत्तेवर हल्ला केला नसल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. बॉम्बर्सनी संध्याकाळी ६.४० वाजता फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या ठिकाणी हल्ला केला आणि त्यानंतर ७.०५ वाजता इराणी हवाई हद्दीबाहेर गेले. दरम्यान, इराणवर हवाई हल्ला करण्याआधी अमेरिकेच्या या विमानांनी अमेरिकेती मिसूरी येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं, अशी माहिती डॅन केन यांनी दिली.

डॅन केन यांच्या मते इराणवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये १४ बंकर-बस्टर बॉम्ब, दोन डझनापेक्षा जास्त टॉमहॉक क्षेपणास्त्रे आणि १२५ हून अधिक लष्करी विमानांचा समावेश होता. अलिकडच्या मध्य पूर्व संघर्षात अमेरिकेने इराणविरुद्ध या दारूगोळ्याचा वापर करण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३७ तास नॉनस्टॉप उड्डाण अन् इंधनही हवेतच भरलं

अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या बी २ बॉम्बरचा वापर केला. इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सनी तब्बल ३७ तास नॉनस्टॉप उड्डाण केलं, एवढंच नाही तर इंधन देखील हवेतच भरलं आणि त्यानंतर अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सनी इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला.