जयपूर : राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात एका सरकारी शाळेच्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी सकाळी कोसळला. सकाळच्या प्रार्थनेसाठी सर्व विद्यार्थी एकत्र येत असतानाच ही दुर्घटना घडली. त्यात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले.

पिपलोडी गावात असलेल्या या सरकारी शाळेच्या इमारतीचा भाग कोसळल्यानंतर सहावी व सातवीमध्ये शिकत असलेले ३५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. काँक्रीट, विटा आणि दगडांचे ढिगारे हटवण्यासाठी अग्निशामक दलाला आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पालक, शिक्षकांसह बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यात मदत केली. सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमी मुलांना झालावाड रुग्णालय आणि मनोहरथाना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जखमींपैकी नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त

राजस्थानातील दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. ‘‘झालावाड येथे शाळेच्या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना दु:खद आहे. शोकाकुल कुटुुंबांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी आणि जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी मी प्रार्थना करते,’’ असे मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. या कठीण काळात माझ्या भावना पीडित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत. अधिकारी पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकांकडून प्रशासनावर निष्काळजीचा आरोप

या शाळेची इमारती धोकादायक होती. शाळेच्या इमारतीच्या स्थितीबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आणि पालकांनी तहसीलदार आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना माहिती दिली होती. परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली, असा आरोप स्थानिकांनी केला.