आंध्र प्रदेश : कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला भीषण आग; मृतांचा आकडा पोहोचला १०वर

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना, बचाव कार्य सुरु

आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील कोविड सेंटर असलेल्या एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत गुदमरुन मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा १० वर पोहोचला आहे, तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाने युद्ध पातळीवर काम करीत ही आग विझवली. आज (रविवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. विजयवाडाचे पोलीस उपायुक्त विक्रांत पाटील यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, आग लागली त्यावेळी स्वर्ण पॅलेस हॉटेल या रुपांतरीत कोविड केअर सेंटरमध्ये ३० रुग्ण आणि १० वैद्यकीय कर्चचारी होते. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पण हॉटेलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून त्यामुळे इथल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दरम्यान, १७ रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर इथल्या सुरक्षा रक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरुन उड्या टाकल्या आहेत. एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले की, “पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. प्राथमिक चौकशीतून शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचे कळते. मात्र, याचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या आग लागलेले हॉटेल पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. सुमारे २२ रुग्ण या ठिकाणी उपचार घेत होते.”

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबाबत ऐकून धक्का बसल्याचे म्हटले आहे. तसेच यात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांप्रती दुःख व्यक्त करीत आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्य राबवण्याबरोबरच जखमींना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Seven people have lost their lives and 30 have been rescued in vijaywada fire on hotel cum covid facility aau

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या