ब्राझील मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, यामध्ये दोन लोक एका पूल हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार करताना दिसत आहेत. या घटनेमागील सत्य समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एका क्षुल्लक कारणावरुन दोन माथेफिरूंनी गोळीबार करुन सात लोकांचा जीव घेतला. झालं असं की, पूल गेम हरल्यानंतर काही लोकांनी मस्करी केली म्हणून दोघांनी १२ वर्षांच्या मुलीसह सात लोकांना जीवे मारले. हल्ला केल्यानंतर दोघेही आरोपी तिथून फरार झाले. पोलीस या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी घडली आहे. ब्राझीलच्या माटो ग्रोसो राज्यातील सिनोप शहरातील एका पूल हॉल येथे ही घटना घडली. दोन्ही आरोपी पूल गेममध्ये लागोपाठ दोन सामने हरले. त्यानंतर तेथील लोकांनी त्यांची थट्टामस्करी करत त्यांच्यावर विनोद केला. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी नको ते कृत्य केले. पूल हॉलच्या सीसीटीव्हीमध्ये सदर घटना कैद झाली आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे, लोक पूल हॉलमध्ये बसली आहेत. तेव्हा तिथे पहिला आरोपी बंदूक घेऊन येतो. सर्वांना हात वर करायला सांगून एका रांगेत उभा राहायला सांगतो. तेवढ्यात तिथे दुसरा आरोपी येऊन त्याच्या हातातील बंदुकीतून अंधाधूंद गोळ्या झाडायला लागतो ज्यामुळे सात लोकांचा मृत्यू झाला. आरोपींची ओळख पटलेली असून एकाचे नाव एडगर रिकार्डो डी ओलिवेरा आणि एजेकियास सूजा रिबेरो असल्याचे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची नावे देखील समोर आले आहेत. लारिसा फ्रासाओ डी अल्मेडा (१२), ओरिसबर्टो परेरा सूसा (३८), एड्रियानो बलबिनोट (४६), गेटुलियो रोड्रिग्स फ्रासाओ ज्युनिअर (३६), जोसू रामोस टेनोरियो (४८) आणि मॅकियल ब्रूनो डी एंड्रेड कोस्टा (३५) अशी मृतांची नावे असून यात लारिसा ही १२ वर्षांची लहान मुलगी देखील आहे.