Shake Modi’s hand And Stab Him Later US Economist Slams Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या टॅरिफमुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे आणि भारतालाही याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. परंतु अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे माजी सल्लागार आणि ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हँके यांच्या मते, ही कदाचित परिस्थिती बिघडण्याची फक्त सुरुवात आहे.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना, हँके यांनी इशारा दिला की ट्रम्प यांची व्यापार धोरणे, भारतापासून दूर जाणे आणि पाकिस्तानशी जवळीक निर्माण यामुळे आर्थिक आणि भू-राजकीय अडचणी निर्माण होऊ शकतात.

यावेळी स्टीव्ह हँके यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणले, “ट्रम्प हा असा माणूस आहे जो सकाळी मोदींशी हात मिळवू शकतो आणि रात्री त्यांच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो.” हँके यांनी पुढे असेही म्हटले की, भारत अमेरिकेच्या मैत्रीवर कायमस्वरूपी अवलंबून राहू शकत नाही.

चीनकडे खूप जास्त ताकद

त्यांनी पुढे म्हटले की, व्हाईट हाऊस जे मान्य करते त्यापेक्षा चीनकडे खूप जास्त ताकद आहे. त्यांनी नमूद केले की, “चीनकडे एक प्रकारचं गुप्त हत्यार आहे, असं म्हणता येईल. कारण त्यांचे खनिज संपत्ती, धातुकर्म आणि पदार्थविज्ञान या तिन्ही क्षेत्रांमध्ये वर्चस्व आहे. आणि हे वर्चस्व त्यांनी बऱ्याच काळापूर्वी हे वर्चस्व मिळवलेले आहे.”

चीनच्या या वर्चस्वाने ट्रम्प यांना त्यांच्याबरोबरच्या संबंधांबाबत पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे, असे हँके म्हणाले.

ट्रम्प पाकिस्तानकडे का झुकले?

“सगळ्यांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मते ट्रम्प यांनी भारताकडून पाकिस्तानकडे झुकण्यामागचे एक कारण म्हणजे आपल्याला पाकिस्तानलाही या चित्रात आणावेच लागेल असे त्यांना वाटते. हे अचानक का घडत आहे? पाकिस्तानची अर्थव्यवस्था तर ठप्प झालेली आहे”, असेही हँके म्हणाले.

पाकिस्तानच्या लष्करातील काहींनी…

हँके यांच्या मते, याचे गुपित अर्थशास्त्रात नाही तर भू-राजकारणात आहे. त्यांनी असा दावा केला की, पाकिस्तानच्या लष्करातील काहींनी देशाच्या परकीय कर्जापैकी ३७% कर्ज ऑफशोअर आश्रयस्थानांमध्ये, बहुतेक दुबईमध्ये वळवले आहे, तरीही अमेरिका अजूनही इराणजवळील हवाई तळांवर प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानकडे मदत मागतो.

“पाकिस्तानचे लष्कर प्रमुख गेल्या महिन्यात दोनदा अमेरिकेत आले आहेत. ते इराणवर आणखी एका हल्ल्यासाठी किंवा संभाव्य हल्ल्यासाठी तयारी करत आहेत”, असेही हँके म्हणाले.