पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्याच्या घडीला प्रति लिटर १०० ते १०६ रुपयांच्या घरात आहेत. २०१४ मध्ये पेट्रोलचे दर ७१ रुपये प्रतिलिटर इतके होते. त्यावेळी महागाई कमी करु असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांमध्ये दिलं होतं. त्यात पेट्रोलच्या दरांबाबतही मोदींनी भाष्य केलं होतं. त्या आश्वासनाची आठवण शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करुन दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“२०१४ ला मोदींनी राज्य हातात घेतलं आणि जाहीर केलं की ५० दिवसांच्या आत पेट्रोलचे दर मी ५० टक्के कमी करतो. आज त्यांची घोषणा होऊन ३ हजार ६५० दिवस झाले आहेत. या दिवसांमध्ये दर खाली आलेले नाहीत. २०१४ ला ७१ रुपये लिटर पेट्रोलचा दर होता. मोदींनी घोषणा करुन ५० टक्के दर कमी करतो सांगितलं होतं त्यामुळे तो दर ३५ रुपये प्रति लिटर व्हायला हवा होता. पण आज पेट्रोलचा भाव काय? १०० ते १०६ रुपये लिटर आहे. ७१ रुपयांवरुन ५० टक्के दर ५० दिवसांत कमी होणार होता आणि आजचा पेट्रोलचा दर १०६ रुपये. याचा अर्थ एकच शब्द दिला एक पण घडतंय दुसरंच.” असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या घोषणेची आठवण करुन दिली आहे.

हे पण वाचा- “राजेंबद्दल आम्ही प्रजा…”, उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, भाजपाला टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार म्हणाले होते बोटाची चिंता वाटते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर आणि रामटेक या ठिकाणी सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका केली होती. जेव्हा मोदी महाराष्ट्रात भाषण करतात तेव्हा ते शरद पवारांचं नाव जरुर घेतात. यावरुनही शरद पवार यांनी त्यांना सुनावलं होतं. मोदी बारामतीला आले तेव्हा माध्यमांना म्हणाले होते की मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो. मला आता माझ्या बोटाची चिंता वाटू लागली आहे असं मिश्किल वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या २०१४ मधल्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.