भोपाळ : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्या पार्थिवावर शनिवारी मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने दिली.

माजी केंद्रीय मंत्री असलेले यादव यांचे गुरुवारी गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Hospital Ajit Pawar wakad
पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन! फुटपाथवर असलेल्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी नाही
jalgaon lok sabha latest news in marathi
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब

यादव यांच्या पार्थिवावर नर्मदापुरम (पूर्वीचे होशंगाबाद) जिल्ह्याच्या बबई तालुक्यातील आँखमाऊ या त्यांच्या मूळ खेडय़ात अंत्यसंस्कार केले जातील, असे त्यांचे जवळचे सहकारी व मध्य प्रदेश जद(यू)चे माजी अध्यक्ष गोविंद यादव यांनी सांगितले. त्यासाठी यादव यांचे पार्थिव दिल्लीहून विमानाने मध्य प्रदेशला आणण्यात येणार आहे.

दरम्यान, शरद यादव यांच्या सन्मानार्थ बिहार सरकारने शुक्रवारी राज्यात दुखवटा जाहीर केला होता. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री कायार्लयाने जारी केले.

‘शरद यादव यांच्याशी माझे घनिष्ट नाते होते. त्यांच्या मृत्यूच्या वार्तेमुळे मला धक्का बसला आहे. यामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दु:ख व्यक्त केले. ते यादव कुटुंबीयांशीही बोलले.

शरद यादव हा वंचितांचा संसदेतील आवाज- राष्ट्रपती

नवी दिल्ली : दिवंगत समाजवादी नेते शरद यादव हे वंचितांचा संसदेतील महत्त्वाचा राष्ट्रीय आवाज होते, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. इतर अनेक राजकीय नेत्यांनीही यादव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

शरद यादव यांच्या निधनाची बातमी कळल्यावर दु:ख झाले. सत्तरीच्या दशकातले विद्यार्थी नेते असलेले आणि लोकशाही मूल्यांसाठी लढा दिलेले यादव हे संसदेत विस्थापितांचा महत्त्वाचा राष्ट्रीय आवाज होते, असे मुर्मू यांनी ट्विटरवर लिहिले.

यादव हे लोकप्रिय नेते व दक्ष प्रशासक होते आणि त्यांनी सार्वजनिक जीवनात उच्च मानदंड प्रस्थापित केले. त्यांच्या अकाली निधनामुळे मला दुख झाले आहे, असे ट्वीट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

पक्षभेद विसरून उच्चपदस्थ राजकीय नेते यादव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीतील छतरपूर भागातील त्यांच्या निवासस्थानी गोळा झाले. या नेत्यांमध्ये गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, काँग्रेस नेते राहुल गांधी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा समावेश होता.

यादव यांचा मृत्यू ही देशासाठी ‘भरून न येणारी हानी आहे’, असे शहा म्हणाले. गेली पाच दशके शरदजींनी जनहिताचे मुद्दे उचलले आणि अखेरच्या श्वासापर्यंत समाजवादी  कल्पनांना प्रोत्साहन दिले, असे ते म्हणाले.

राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रा सुरू असलेल्या पंजाबमधून दिल्लीला पोहचले. माझी आजी इंदिरा गांधी व शरद यादव हे राजकीय प्रतिस्पर्धी होते, मात्र त्यांच्यात नेहमीच परस्परांबाबत आदराचे नाते राहिले, असा उल्लेख त्यांनी केला.

अखेरच्या श्वसापर्यंत लोकशाही धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांना बांधील राहिलेला मोठय़ा उंचीचा समाजवादी नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी शोक व्यक्त केला. केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पत्नी सावित्री सिंह, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनीही यादव यांना श्रद्धांजली वाहिली.