मुंबई : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रविराम आणि थंडावलेल्या लष्करी कारवाया तसेच अमेरिका-चीनने व्यापार शुल्कात लक्षणीय घट करण्याचा करार जाहीर केल्याने दुणावलेल्या उत्साहात, सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी एका सत्रातील सर्वात मोठी मुसंडी सोमवारी नोंदवली. तब्बल पावणेचार टक्क्यांनी उसळलेल्या निर्देशांकांमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या संपत्तीत १६.१५ लाख कोटींची श्रीमंती अनुभवता आली.

मोठी भरारी घेत खुला झाल्यानंतर, मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ सोमवारी सत्रअखेर २,९७५.४३ अंशांनी वधारून ८२,४२९.९० या सात महिन्यांच्या उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात तो ३,०४१.५ अंशांनी वाढून ८२,५०० समीप पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ९१६.७० अंशांनी झेप घेत २४,९२४.७० वर बंद झाला. दिवसभरात या निर्देशांकानेही जवळपास ४ टक्क्यांच्या मुसंडीसह २४,९४४.८०च्या उच्चांकाला गाठले होते. शस्त्रविराम आणि उभयतांनी सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया थांबविण्यासाठी दाखविलेल्या सहमतीचे भांडवली बाजाराने जोरदार स्वागत केले. यापूर्वी ३ जून २०२४ रोजी ‘सेन्सेक्स’ने २,५०७.४५ अंशांची आणि निफ्टीने ७३३.२० अंशांची एका दिवसातील सर्वाधिक वाढ नोंदवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहिती-तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, धातू, स्थावर मालमत्ता आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांच्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने एका दिवसातील सर्वोत्तम वाढ नोंदवली. अमेरिकेतील औषधांच्या किमतीतील सुधारणांबाबत चिंतांमुळे केवळ औषधी क्षेत्रातील समभाग मात्र नरमलेले होते. सेन्सेक्समधील सन फार्मा आणि इंडसइंड बँक हे केवळ दोन समभाग मागे राहिले. व्यापक बाजारपेठेवरही तेजीवाल्यांची पकड दिसून आली आणि मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे निर्देशांकही जवळपास ४ टक्क्यांनी उसळले.