पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या आजारी आईला दुबईतून विशेष विमानाने पाकिस्तानात आणण्याची तयारी सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून दर्शविली आहे.
मुशर्रफ यांच्या आईला उपचारासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा सरकारच्या वतीने पुरविण्यात येतील, असे पंतप्रधानांच्या कार्यालयातून प्रसृत करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुशर्रफ यांच्या आईवर पाकिस्तानात उपचार होऊ शकतील आणि मुशर्रफ आपल्या आईसमवेत राहू शकतील, यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याची सरकारची तयारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मुशर्रफ यांच्याविरुद्ध सध्या पाकिस्तानात अनेक खटले प्रलंबित असून त्यांना देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आलेल्या व्यक्तींच्या यादीत मुशर्रफ यांचे नाव आहे. सदर यादीतून आपले नाव वगळावे यासाठी मुशर्रफ यांनी केलेली याचिका सिंध उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
दरम्यान, मुशर्रफ यांचे प्रवक्ते आसिया इशाक यांनी सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. मात्र मुशर्रफ देश सोडून पसार होणार नाहीत याची खात्री पटल्यानेच सरकारने ही भूमिका घेतली असल्याचे इशाक यांनी म्हटले आहे. मात्र मुशर्रफ यांच्या आईला पाकिस्तानात आणण्यात येईल का, हा प्रश्न त्यांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे, असेही इसाक म्हणाल्या.