Shashi Tharoor apologises after Team India vs England Oval Test win: भारताने ओव्हल येथे खेळलेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला आहे. अखेरचा सामना अवघ्या ६ धावांनी जिंकत भारताने मालिकेत २-२ने बरोबरी साधली आहे. या टीम इंडियाच्या विजयानंतर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे तोंडभरून कौतुक केले आहे. याबरोबरच त्यांनी माफी देखील मागितील आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये थरूर यांनी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचे देकील विशेष कौतुक केले आहे.

थरूर यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, “माझे शब्द अपुरे पडत आहेत… काय शानदार विजय आहे! इंग्लंड विरोधातील मालिकेत मिळवलेल्या विजयाने पूर्णपणे संतुष्ट आणि उत्साहित आहे! त्यांनी दाखवलेलं धैर्य, दृढनिश्चय आणि तीव्र भावना अविश्वसनीय होती. हा संघ खास आहे.”

पुढे थरूर यांनी त्यांची चूक देखील मान्य केली आहे. “काल सामन्याच्या निकालाबद्दल मी शंका व्यक्त केल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मोहम्मद सिराजने विश्वास ठेवणं कधीच बंद केल नाही! आपल्या हिरोंना शाबास!”

नेमकं प्रकरण काय आहे?

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी यापूर्वी एक्सवर दुसरी एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी विराट कोहलीला उद्देशून म्हटले होते की तो असता तर या सामन्याचा निकाल काहीतरी वेगळा लागला असता असे म्हटले होते. त्यांनी लिहीले होते की, “मला या सिरीजदरम्यान काही वेळा विराट कोहलीची आठवण झाली, पण या कसोटी सामन्यात जितकी आली तेवढी कधीच नाही नाही. त्याचे धैर्य आणि उत्साह, मैदानावरील त्याची प्रेरणादायक उपस्थिती आणि दमदार फलंदाजी, यामुळे कदाचित वेगळा निकाल मिळाला असता. त्याने निवृत्तीतून माघार घेण्यासाठी खूप उशिर झाला आहे का? विराट, देशाला तुझी गरज आहे!”

अवघ्या ६ धावांनी विजय

भारताने मालिकेच्या अखेरच्या सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला आहे. या विजानंतर भारताने पाच सामन्यांची ही मालिका २-२च्या बरोबरीवर संपवली आहे. अखेरच्या कसोटीत भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने दमदार गोलंदाजी केली. सिराजलाच या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने पहिला सामना ५ गडी राखून जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ३३६ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंचा संघ २२ धावांनी विजयी ठरला. चौथा सामना ड्रॉ झाल्यानंतर सर्वांच्या नजरा आता पाचव्या कसोटीकडे लागल्या होत्या. हा सामना भारताने ६ धावांनी आपल्या नावावर केला. अशा पद्धतीने मालिका २-२ ने बरोबरीवर संपली.