न्यूयॉर्क : पाकिस्तानात बसून भारतावर हल्ला करणाऱ्यांना आता त्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा काँग्रेस खासदार आणि अमेरिकेत गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे प्रमुख शशी थरूर यांनी शनिवारी दिला. थरूर यांच्या शिष्टमंडळाने गयाना, पनामा, कोलंबिया, ब्राझील आणि अमेरिका येथे जाऊन भारताची बाजू मांडली. पहलगाममधील हल्ला हेच भारत-पाकिस्तान संघर्षाचे कारण आहे, ‘ऑपरेशन सिंदूर’ नव्हे हे जगभरात सांगण्याचे काम ही शिष्टमंडळे करीत आहेत.
न्यूयॉर्कमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाने शनिवारी आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमाला भारतीय वंशाचे निवडक सदस्य, पत्रकार आणि अभ्यास गटांच्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी थरूर म्हणाले की, भारताचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश आहे, आम्हाला कोणतीही सुरुवात करायची इच्छा नाही. आम्ही केवळ दहशतवाद्यांना संदेश देत होतो.
तुम्ही सुरुवात केली, आम्ही उत्तर दिले. तुम्ही थांबलात तर आम्हीही थांबू आणि ते थांबले. हे ८८ तासांचे युद्ध होते, ते व्हायची अजिबात गरज नव्हती. त्यात अनेकांचे प्राण गेले. पण आम्ही याकडे दृढनिश्चयाची पोलादी आणि नवी भावना या नजरेने पाहतो. थरूर यांच्या शिष्टमंडळात झारखंड मुक्ती मोर्चाचे सरफराज अहमद, तेलुगू देसमचे गुंटी हरीश मधुर बालयोगी, भाजपचे शशांक मणी त्रिपाठी, भुवनेश्वर कलिता आणि तेजस्वी सूर्या तसेच शिवसेनेचे मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. त्याशिवाय अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरणजीत संधू हेदेखील शिष्टमंडळाचे सदस्य आहेत.
‘सरकारसाठी काम करत नाही’
आपण केंद्र सरकारसाठी काम करत नसल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘मी सरकारसाठी नव्हे, तर विरोधी पक्षासाठी काम करतो. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर दोन दिवसांत इंग्रजीतील आघाडीच्या ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये मी लेख लिहिला होता. त्यामध्ये जोरदार प्रतिसाद दिला पाहिजे, असे लिहिले होते. भारताने नेमके तेच केल्यामुळे मी समाधानी आहे.’’
आता हा नवा नियम आहे. पाकिस्तानात बसून कोणालाही भारतीयांची हत्या करू देणार नाही. त्यांची शिक्षेतून सुटका होणार नाही. त्यांना किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत पद्धतशीरपणे वाढत आहे. – शशी थरूर</strong>, खासदार, काँग्रेस</p>