Israel Iran Conflict Female Spy आम्ही तुम्हाला सांगत आहोत ती कुठल्याही बाँडपटाची स्टोरी नाही. ही बातमी इराणच्या तेहरानमधली. तेहरानमधली एक ‘मोहतरमा’ अचानक चर्चेत आली आहे. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद ही सफाईने काटा काढण्यासाठी आणि नामानिराळं राहण्यासाठी ओळखली जाते. मोसादसाठी काम करणाऱ्या कॅथरिन पेरेझ शेकेडनं आपल्या सौंदर्याचं असं जाळं फेकलं की त्यात इराणचे नऊ शास्त्रज्ञ फसले. त्यांना ठार करुन ती आता गायब झाली आहे. ती कुठे आहे हे सांगता येणं कठीण आहे.
दोन वर्षांपूर्वी इराणमध्ये आली मोसादची हसीना
दोन वर्षांपूर्वी कॅथरिन पेरेझ इराणमध्ये दाखल झाली. इराणमध्ये दाखल झाल्यावर तिने शिया इस्लाम धर्म स्वीकारला. इराणमधल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बायका ज्या प्रमाणे वागतात, वावरतात अगदी त्याचप्रमाणे कॅथरिन वावरु लागली. त्यामुळे तिने लवकरच सगळ्यांचा विश्वास संपादन केला. मुळात फ्रेंच असलेल्या कॅथरिनला मोसादने इराणच्या विरोधात विशेष मोहिमेवर पाठवलं होतं. तिच्या भाषेचा लहेजा आणि तिची मुस्लिम असल्याचं भासवण्याची कौशल्यं ही इतकी साधी आणि सहज होती की तिचा कुणाला संशय आला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांमध्ये ती वावरु लागली त्यांच्या बायकांशी तिने ओळख वाढवली. त्यामुळे तिला अनेक गुप्त भागांमध्येही जाऊन तिथे काय घडामोडी घडतात किंवा कशी धोरणं आखली जातात हे अनुभवयाला मिळालं. खरंतर इराणमध्ये येणाऱ्या नागरिकांचे फोन हे अनेकदा तपासले जातात. पण या सगळ्यापासून कॅथरिनने स्वतःला शिताफीने दूर ठेवलं आणि ती शांतपणे फोटो तसंच व्हिडीओ घेत होती आणि थेट मोसादला पाठवत होती. इंडिया.कॉमने हे वृत्त दिलं आहे.
इराणचे अधिकारी सुरक्षित स्थळी जात होते पण…
इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष वाढला की अनेक अधिकारी त्यांची लोकेशन बदल होते. लोकेशन बदललं की आपण सुरक्षित आहोत असं त्यांना वाटत होतं. पण प्रत्येक वेळी हल्ला झाला की अधिकारी अशा प्रकारे मारले जात जणू काही कुणीतरी त्यांना आधीच तिथला नकाशा आणि सगळी माहिती पुरवली आहे. हे असं का घडतंय? हे जाणून घेण्याचा इराणच्या गुप्तचर संस्थांनी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना कॅथरिनबाबत हळूहळू समजलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ही माहिती जाणून घेण्यासाठी कॅथरिन पेरेझने हनी ट्रॅपचा वापर केल्याची माहितीही समोर आली आहे.
मोसादच्या मोहतरमाने म्हणजेच कॅथरिनने दिलेल्या माहितीमुळे इराणमधले नऊ तज्ज्ञ ठार झाले आहेत.
फेरेदुन अब्बासी, अणु अभियांत्रिकी
मोहम्मद महदी तेहरानी, भौतिकशास्त्र
अकबर मतलाली जादेह, रासायनिक अभियांत्रिकी
सईद बेराजी, धातुविषयाचे अभ्यासक
अमीर हसन फकाही,भौतिकशास्त्र
अब्द अल-हमीद, अणुभट्टी तज्ञ
मन्सूर असगरी, भौतिकशास्त्र
अहमद रजा दरयानी, अणु अभियांत्रिकी
अली बखायी, यांत्रिक अभियांत्रिकी
कॅथरिन दोन वर्षे इराणमध्ये ओळख बदलून राहिली
या नऊ जणांचा बळी एकाच प्रकारे गेला आहे. ज्यामुळे मागच्या दोन वर्षांतर इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मोसादमध्ये सुमारे १२०० गुप्तहेर काम करतात, यापैकी सुमारे ४० टक्के महिला आहेत. यातील ३०० महिला उच्चस्तरीय आहेत. त्यांना अत्यंत कठोर आणि विशेष प्रशिक्षण दिले जाते. मानसिक लवचिकता, गुप्त संवाद, शस्त्र हाताळणे, अभिनय, भाषांचे ज्ञान, आणि इतर अनेक कौशल्ये यासाठी. महिला एजंट्स बहुतेक वेळा अविवाहित असतात कारण मिशनमुळे त्यांना दीर्घकाळ गुप्त ठिकाणी राहावे लागतं. दरम्यान आता मोसादची मोहतरमा अर्थात कॅथरिन कुठे आहे हे सांगता येणं कठीण आहे. इराण सोडून ती कदाचित तिसऱ्याच कुठल्याही देशात असू शकते अशीही माहिती समोर आली आहे.