अंगणवाडी सेविकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दिल्लीत भेटलो. मात्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली नसल्याचे स्पष्टीकरण शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले.  शिवसेना नेते अनंत गीते यांनी  वाकचौरेंची पाठराखण करताना,  शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वाकचौरेच उमेदवार असतील, अशी घोषणाच करून टाकली. त्यावर शिवसेनेच्याच एका नेत्याने, उमेदवारी वाटपाचा निर्णय कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेच करतील, असे सांगून गीतेंनी घोषीत केलेल्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह लावले.
वाकचौरेंची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्या संमतीने घोषीत केली का, या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर गीते यांनी दिले.  शिर्डी मतदारसंघातून २००९ साली वाकचौरे आरपीआयचे रामदास आठवले यांचा पराभव करून विजयी झाले.  गेल्या अनेक दिवसांपासून वाकचौरे यांचे तळ्यात-मळ्यात सुरु आहे.