पणजीतून उत्पर पर्रिकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यांनी म्हटल्याप्रमाणेच शिवसेनेचे पणजी मतदारसंघातील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी याबद्दल माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्ही आमचा शब्द पाळत आहोत. शिवसेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे. इतकेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा देतील. पणजीची लढाई ही केवळ निवडणुकीपुरती आहे. पण हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरणही आहे, असे आमचे मत आहे,” असं संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये आदित्य ठाकरेना टॅग केलंय. तसेच उत्पल पर्रीकर यांचा कोट असलेला एक फोटो या ट्वीटमध्ये आहे, ज्यात म्हटलंय, “तुम्ही दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्वभूमी  असलेल्या व्यक्तीला तिकीट द्याल?”. भाजपाने बाबुश म्हणून ओळखले जाणारे अटानासियो मोन्सेरेट यांना पणजीतून उमेदवारी दिल्यानंतर उत्पल पर्रिकरांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच अनुषंगाने हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरण असल्याचं राऊत यांनी म्हटलंय.

पणजी जागेसाठी उत्पल पर्रिकर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर २७ जानेवारीला त्यांनी त्यांच्या निर्णयाची घोषणा केली. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना उत्पल पर्रिकर म्हणाले होते, “मला माझ्या वडिलांचं काम पुढे न्यायचं आहे. मी पणजीतल्या लोकांसाठी २०० टक्के देऊन काम करीन. ते मला पाठिंबा देतील याची मला खात्री आहे. निवडणूक जिंकण्याविषयीच्या विश्वासाबद्दल विचारणा केली असता पर्रिकर म्हणाले, पणजीच्या लोकांचा मला पाठिंबा आहे. पणजीच्या भविष्यासाठी ते मला नक्कीच मतं देतील.”

उत्पल यांना भाजपाने निवडणुकीत उमेदवारी नाकारली. उत्पल हे इच्छुक असलेल्या पणजी मतदारसंघातून भाजपाने बाबूश मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली़ यामुळे उत्पल हे काय निर्णय घेणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. उत्पल यांनी पणजी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती़. मात्र, त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बाबूश यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली़. उत्पल यांना भाजपाने अन्य दोन मतदारसंघांचे पर्याय दिले होते़. मात्र, त्यांना ते अमान्य होते. त्यामुळे त्यांनी बंड करत अपक्ष लढण्याचा पर्याय निवडला होता.


मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena dropped candidate from panaji to support utpal parrikar hrc
First published on: 31-01-2022 at 14:36 IST