शिवसेनेच्या विरोधामुळे ज्येष्ठ गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आल्यानंतर विरोधकांनी सेनेवर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना पक्ष इंडियन तालिबान होऊ पाहतोय, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. वाराणसीच्या मंदिरात गुलाम अली ‘संकट मोचन’ गाऊ शकतात मग मुंबईतील कार्यक्रमासाठी त्यांना विरोध का केला जातो? असा सवाल उपस्थित करून दिग्विजय यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. गुलाम अलींच्या मुंबईतील कार्यक्रमाला विरोध करून शिवसेना वाराणसीतील ब्राम्हणांपेक्षा आपण मोठे धर्मरक्षक असल्याचे मानते का?, असाही सवाल दिग्विजय यांनी यावेळी उपस्थित केला. शिवसेना, भाजप आणि संघ परिवार धर्माचा वापर राजकारण आणि खंडणीखोरीसाठी करीत आहे, अशी तोफ देखील दिग्विजय यांनी डागली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमासाठी पोलीस संरक्षण देण्याची तयारी दाखवूनही शिवसेनेच्या विरोधामुळे ज्येष्ठ गझल गायक गुलाम अली यांचा ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास किंवा तेथील खेळाडू व कलावंत यांना मुंबईत किंवा राज्यात पाय ठेवू देणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध मागे घेण्यास नकार दिल्याने अखेर आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.