पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मोदींच्या भाषणामधूनही या दौऱ्यामागील राजकीय हेतू दिसून आला. पंतप्रधान मोदींनी त्यांची जात तसेच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. मात्र याच विषयावरुन आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ गटाने मोदींना लक्ष्य केलं आहे. जम्मू-काश्मीर नेहरुंमुळे तातडीने भारतात विलीन करुन घेण्यात आलं नाही असं म्हणणाऱ्या मोदींना जम्मू-काश्मीरमध्ये सध्या काश्मिरी पंडितांची अवस्था काय आहे याची आठवण करुन दिली आहे. तसेच पंतप्रधानांना आताच्या भाषणात जात काढण्याची काहीच गरज नव्हती असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”

“पंतप्रधान मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जितकी इत्यंभूत माहिती आहे, तेवढी आपल्या देशातील घडामोडींविषयी आहे काय, असा प्रश्न अनेकदा पडतो. भारतीय जनता पक्षाने मोदी यांना निवडणुका जिंकून देणारा यंत्रमानव बनवले आहे,” असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपादक असणाऱ्या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून लागवला आहे.

“पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. तेथील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या दौऱ्याचे आयोजन व नियोजन भाजपाने केले आहे. मोदी यांनी एका सभेत सांगितले की, ‘‘माझी जात वगैरे न पाहता गुजरातच्या जनतेने मला समर्थन दिले.’’ ऐन निवडणुकीत मोदी यांना आपल्या जातीची आठवण का व्हावी? गुजरातला शहरी नक्षलवादाचा धोका वाढत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याचा विसर त्यांना गुजरातला गेल्यावर अनेकदा पडतो. मोदींचे पहिले विधान स्वतःच्या जातीविषयी आहे. पंतप्रधानांच्या मनात स्वतःची जात असावी हे बरे नाही. जात विसरायला हवी. जात नाही ती जात या सावटातून बाहेर पडले पाहिजे. मोदी यांना देशभरातून मतदान झाले. अनेक मोठ्या राज्यांनी मोदी यांना भरघोस मतदान केले. तेथे जातीचा प्रश्न येतोच कोठे? त्यामुळे गुजरातच्या भूमीवर अशा प्रकारे जातपंचायत लावण्याची गरज नव्हती,” असं ‘सामना’च्या लेखामधून म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? सत्तांतरणासंदर्भातील नाना पाटेकरांच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “आम्ही जर…”

“गुजरातमध्ये शहरी नक्षलवाद वाढतो आहे, त्यापासून धोका आहे. ही चिंतेची बाब आहे, पण हा धोका संपूर्ण देशातच निर्माण झाला आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात शहरी नक्षलवादाचे कारस्थान समोर आले व त्यानंतर मोठ्या प्रमाणात धरपकड झाल्याचे दिसले. हा नवा दहशतवाद देशभरातच फोफावतो आहे. त्यात मुसलमानांचा सहभाग नसल्याने ‘भाजपा’ त्यावर बोंब मारू इच्छित नाही, पण शहरी नक्षलवादाने अनेक राज्ये पोखरली आहेत. त्यातले एक गुजरात आहे. मुळात गुजरातला सगळ्यात जास्त धोका अमली पदार्थांच्या तस्करीपासून आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत

“गेल्या काही महिन्यांत हजारो कोटी रुपयांचे ‘ड्रग्ज’ गुजरातच्या विमानतळांवर आणि बंदरांवर सापडले. ही चिंतेची बाब आहे. हे सर्व रॅकेट सुरळीत सुरू आहे. दहा हजार कोटींचा अवैध दारूचा व्यापार गुजरातेत सुरू असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. हा आरोप नसून सत्यच आहे. याबाबतची सत्य माहिती पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्यात गुप्तचर खाते कमी पडले, की पंतप्रधानांपासून गुजरातबाबतचे सत्य लपवले जात आहे? पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादेत आणखी एक जळजळीत विधान केले ते कश्मीरविषयी. आपले पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील अनेक वेगवेगळी संस्थाने विविध राज्यांमध्ये विलीन केली. देश एकसंध केला, पण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना केवळ कश्मीरचा एक प्रश्न सोडवता आला नाही. कश्मीरचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आज आपण सरदारांनी दाखवलेल्या मार्गानेच जात आहोत.’ मोदी यांनी हे अत्यंत परखड व जळजळीत भाष्य केले. मोदी कश्मीर व नेहरूंबाबत हे भाषण करत असताना तिकडे कश्मीरात काय सुरू होते? 10 ऑक्टोबरला सकाळपासूनच कश्मिरी पंडित आपल्या सुरक्षेसाठी श्रीनगर व इतरत्र रस्त्यांवर उतरले होते. कश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी पंडित रस्त्यांवर उतरून केंद्र सरकारविरोधात आक्रोश करीत होते. आंदोलन करीत होते. आमचे संरक्षण करा. आम्हाला सुरक्षित स्थळी हलवा, अशा किंकाळ्या फोडत होते. हे चित्र धक्कादायक तितकेच मन विषण्ण करणारे आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदेंकडे गेलं तरी…”; आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, “हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे…”

“नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे का वाजवायचे? कश्मीरात गेल्या पाच महिन्यांपासून कश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग वाढले आहे. पंडित भयाच्या सावटाखाली वावरत आहेत. केंद्र सरकारने पंडितांना सुरक्षेची हमी दिली होती, पण पंडित मारले जात आहेत व पलायन करीत आहेत. यात नेहरूंचा काय दोष?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

नक्की वाचा >> “…त्या दिवशी मला फार दु:ख झालं”; उद्धव ठाकरेंसंदर्भातील ‘तो’ प्रसंग सांगत सुधीर मुनगंटीवार यांचं विधान

“मागच्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा कश्मीर दौऱ्यावर असताना राज्याच्या पोलीस महासंचालकांची हत्या झाली. हे आता रोजचेच झाले आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत अनंतनाग येथे पंडितांसाठी वसाहत उभी केली. तेथे तर आता स्मशानशांतता आहे. सुरक्षा कडे आहे, पण बाहेर पडल्यावर पुन्हा घरी परतण्याची खात्री नाही. कश्मीरमध्ये पंडित व इतर हिंदू जीव मुठीत धरून जगत आहेत. पंतप्रधानांपर्यंत ही सत्य माहिती पोहोचू नये याचे आश्चर्य वाटते. रशिया-युक्रेन युद्धावर आपले पंतप्रधान बोलतात. ही युद्धाची वेळ नाही असे त्यांनी पुतीन यांना मैत्रीच्या नात्याने बजावले. त्याचा चांगलाच आंतरराष्ट्रीय गवगवा झाला, पण कश्मीरात जे सुरू आहे त्याचे खापर नेहरूंवर फोडून पंतप्रधान मोदी मोकळे झाले,” असा शाब्दिक चिमटा शिवसेनेनं काढला आहे.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: “२० वर्षांपासून मशाल आमचं चिन्ह, ते आम्हाला…”; ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार? प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी मोदी यांना पंतप्रधान केले. मोदी हे का विसरत आहेत? मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार? असा प्रश्न पडावा अशी त्यांची वक्तव्ये आहेत. पुन्हा त्यांना आता गुजरात निवडणुकीच्या चक्रव्यूहात पक्षाने अडकविले, म्हणजे कश्मिरी पंडितांच्या किंकाळ्या हवेतच विरणार. आता नेहरू काय करणार?” असा उपहासात्मक प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.