नवी दिल्ली : राज्यातील मतदारयाद्यांमधील चुका निदर्शनास आणण्यासाठी गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या दोन खासदारांना सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ताटकळत बसावे लागले.
अखेर खासदार अरविंद सावंत यांनी कार्यालयात वाट पाहात असल्याचे छायाचित्र प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवल्यानंतर निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी मंगळवारी वेळ दिली जाईल, असे आयोगातील अधिकाऱ्यांनी दोन्ही खासदारांना सांगितले.
मतदारयाद्या दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी मतदारयाद्यांतील घोळ दुरुस्त करण्याची विनंती करण्यासाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची मुंबईत भेट घेतली होती.
मात्र, हे बदल करण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अख्यतारित असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाशी संपर्क साधला होता. त्यावर, ‘दिल्लीत येऊन भेटा,’ असे सांगण्यात आले. ‘‘त्यानुसार आम्ही सोमवारी दिल्लीत आलो व केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीची वेळ मागितली होती,’’ असे शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
