Shreyas Talpade Protected From Arrest By SC: सहकारी संस्थेच्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून नाव असलेल्या ‘गोलमाल’ फेम अभिनेता श्रेयस तळपदे विरुद्ध सक्तीची पावले उचलण्यास सर्वोच्च न्यायालयाने तीन राज्यांतील पोलीस अधिकाऱ्यांना मनाई केली आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणामध्ये दाखल झालेल्या एफआयआरमध्ये नाव असलेल्या श्रेयस तळपदे याने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने त्याला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. याचबरोबर न्यायालयाने तिन्ही राज्यांना नोटीस बजावली आणि एफआयआरमध्ये तळपदे याचे नाव का समाविष्ट करण्यात आले याचे स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.

ह्युमन वेल्फेअर क्रेडिट अँड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या आर्थिक संकटातून उद्भवलेल्या अनेक प्रकरणांमध्ये नाव आल्यानंतर श्रेयस तळपदेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही सोसायटी सागा ग्रुपचा भाग आहे, ज्यावर अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध विविध राज्यांत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये फसवणूक, गुन्हेगारी विश्वासघात आणि तोतयागिरीचे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, श्रेयस तळपदेने सर्व एफआयआर एकत्रित करण्याची आणि तपास लखनौला हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. असा आरोप आहे की, श्रेयस तळपदेने सहकारी संस्थेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करून या संस्थेला प्रोत्साहन देण्यात भाग घेतला आणि त्याच्या सार्वजनिक समर्थनामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पण, श्रेयस तळपदेने कंपनीशी कोणताही व्यावसायिक संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

याचिकेनुसार, श्रेयस तळपदेला २०१८, २०१९ आणि २०२२ मध्ये सागा ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना पाहुणे सेलिब्रिटी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्याचा असा दावा आहे की, या व्यावसायिक कामांमुळे त्यांची उद्योगातील उपस्थिती वाढली आणि चित्रपटातील संधी मिळण्यास मदत झाली.

यावेळी श्रेयस तळपदेने असा दावा केला की, त्याचा या ग्रुपशी किंवा तपासाच्या केंद्रस्थानी असलेल्या सहकारी संस्थेशी पूर्वीचा किंवा सततचा कोणताही संबंध नव्हता.

श्रेयस तळपदेच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, तळपदेविरुद्ध दाखल केलेले एफआयआर विशिष्ट आरोप किंवा पुराव्याशिवाय होते. त्यांनी असे म्हटले की, त्याची भूमिका मर्यादित होती आणि सोसायटीच्या आर्थिक क्रियाकलापांशी त्याचा संबंध नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने तळपदे याच्याविरुद्ध अटकेची कारवाई स्थगित केल्याने, आता प्रतिवादींनी त्यांचे उत्तर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होईल.