Sikh man shot by LA police in US : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारता एका ३५ वर्षीय शीख व्यक्ती ठार झाल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मृत व्यक्ती ‘क्रिप्टो डॉट कॉम’ अरेनाजवळ हातात तलवार (machete) घेऊन उभा होता. दरम्यान ही घटना जुलै महिन्यात घडली असून नुकतेच पोलिसांनी या घटनेचा व्हिडीओ जारी केला आहे.

ही घटना १३ जुलै रोजी सकाळी घडली होती. या दिवशी ९११ या अमेरिकेतील आपत्कालीन क्रमांकावर अनेकांनी फोन करून Figueroa स्ट्रीट आणि ऑलिंपिक Boulevard या वर्दळीचा भाग असलेल्या चौकात एक व्यक्ती हातात तलवार घेऊन उभा असल्याचे कळवले होते. पोलिसांनी या घटनेतील मृत व्यक्तीची ओळख गुरप्रीत सिंग अशी पटवली आहे.

एलएपीडीने काल त्यांच्या युट्यूब चॅनलवर या घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये तो व्यक्ती रस्त्यावर ‘गतका’ म्हणजे शिख धर्मीयांचा एक पारंपरिक युद्धकला प्रकार सादर करताना पाहायला मिळत आहे.

लॉस एंजेलिस पोलीस विभागाच्या (LAPD) मते, सिंग याने त्याची कार ही रस्त्याच्या मध्येच सोडून दिली होती, आणि तो अत्यंत आक्रमकपणे हातातील तलवार फिरवत होता, एकावेळी त्याने त्या शस्त्राने स्वतःची जीभ कापण्याचाही प्रयत्न केला, असेही पोलिसांनी म्हटले. दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी त्या व्यक्तीला अनेकवेळा हातातील तलवार टाकून देण्यास सांगितले गेले, पण त्याने तसे करण्यास नकार दिला.

त्यानंतर तो काही काळासाठी त्याच्या गाडीकडे आला, त्यामधून पाण्याची बाटली घेतली आणि पोलिसांकडे भिरकावली. त्यानंतर गाडीच्या खिडकीतून तलवार बाहेर काढून तो गाडी घेऊन निघून गेला. रस्त्यावर तो बेदरकपणे गाडी चालवत असताना पोलिसांनी काही काळासाठी त्याच्या गाडीचा पाठलाग देखील केला. त्यानंतर त्याने गाडीने पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर अखेर तो Figueroa आणि 12th स्ट्रीट्स जवळ थांबला, येथेच तो शस्त्र घेऊन अंगावर धावून आल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

या प्रकारानंतर सिंग याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचा झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाला. एलएपीडीने सांगितले की त्यांनी घटनास्थळावरून दोन फूट लांबीची तलवार जप्त केली आहे. या घटनेत कोणताही अधिकारी किंवा सामान्य नागरिक जखमी झाला नाही, असेही पोलीस विभागाने स्पष्ट केले.