पीटीआय, जम्मू, श्रीनगर
जम्मू विभागात शनिवारी रात्रभरात सीमेपलिकडून गोळीबार किंवा ड्रोनच्या हालचाली आढळल्या नाहीत अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. रविवारी दिवसभरात जम्मू विभागात आणि विशेषत: नियंत्रण रेषेला लागून असलेल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण शांतता राहिली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोळीबार थांबल्यामुळे सीमा भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. रविवारी जनजीवन सुरळीत झाले तरी काही भागांमध्ये मात्र बाजारपेठा बंद राहिल्या. पाकिस्तानचा गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आणि इतर अनेकजण जखमी झाले आहेत.
पंजाब आणि राजस्थान या अन्य सीमेलगतच्या राज्यांत पाकिस्तानचे हल्ले थांबल्यामुळे जनजीवन पूर्ववत झाले असून नागरिकांनी आपापली दैनंदिन कामे सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगतिले.
घरी परतण्याची घाई करू नका!
श्रीनगर : नियंत्रण रेषेला आणि आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या गावांमधील लोकांना घरी परतण्याची घाई करू नका असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे ही गावे रिकामी करण्यात आली होती. शस्त्रविरामानंतर तेथील स्फोटके अद्याप नष्ट केली गेलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी परतायची घाई करू नये असे सांगण्यात आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यापासून नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला, बांदीपुरा व कुपवाडामधील सुमारे १.२५ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.