सिंगापूर : सिंगापूरमधील दोनशे वर्षे जुन्या पदांग या खुल्या हिरवळीच्या मैदानाला येथील सरकारने मंगळवारी पंचहत्तरावे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केले आहे. विशेष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच मैदानावरून १९४३ मध्ये ब्रिटिशांविरोधात दिल्ली चलो ची हाक दिली होती.

सिंगापूर सरकारने ५७ व्या राष्ट्रीय दिनी पदांग हे स्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे मैदान अनेक संस्मरणीय घटनांचे साक्षीदार आहे. सिंगापूरच्या मध्यवर्ती भागातील हे स्थळ ४.३ हेक्टरवर आहे. सिंगापूरच्या राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतील हे पहिलेच खुले हिरवळीचे ठिकाण आहे. एखादी इमारत किंवा स्थळाचा या यादीत समावेश होणे हा त्या स्थळाचा सर्वोच्च बहुमान समजला जातो. हे मैदान क्रिकेट, फूटबॉल, हॉकी, टेनिस आणि लॉन बॉिलग आदींच्या सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. सन १८०० पासून वापरत असलेले हे मैदान देशातील सर्वात जुन्या मैदानांपैकी एक आहे. 

सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यास विभागाचे प्रमुख राजेश राय यांनी सांगितले की, सिंगापूरमधील भारतीय समुदायाच्या दृष्टीने पदांग या स्थळाला आगळे महत्त्व आहे. या बेटावर ब्रिटिशांनी जेव्हा त्यांचे आऊट पोस्ट उभारले, तेव्हा तेथे भारतीय शिपायांनीच प्रथम आपला तळ उभारला होता. याच ठिकाणावरून नेताजींनी आझाद हिंद सेनेचे जवान आणि येथील भारतीयांपुढे भाषणे दिली होती. येथेच त्यांनी चलो दिल्लीची घोषणा दिली आणि झाशी राणी  पलटणीची स्थापना केली. युद्ध संपण्याच्या काही दिवस आधी याच मैदानाच्या दक्षिण टोकाला त्यांनी आझाद हिंद सैनिकांचे स्मारक उभारले होते. ते अजूनही तेथे आहे.

ऐतिहासिक महत्त्वामुळे जतन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मैदानाचे राष्ट्रीय, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेता त्याचे जतन केले जात आहे आणि आता त्याला सिंगापूरच्या स्मृतीस्थळे संरक्षण कायद्याखाली सर्वोच्च दर्जाचे संरक्षण दिले जाणार आहे, असे राष्ट्रीय वारसा मंडळाने (एनएचबी) म्हटले आहे. पदांग  या शब्दाचा मलाय भाषेतील अर्थ हा शेत किंवा क्षेत्र असा आहे. वसाहतकाळात सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मैदानांपैकी ते एक आहे.