पीटीआय, नवी दिल्ली
कर्नाटकच्या बंगळूरु मध्य आणि अन्य मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमधील गैरप्रकारांच्या आरोपांची माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.
ॲड. रोहित पांडे यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बंगळूरु मध्य लोकसभा मतदारसंघातील, महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये गैरप्रकाराचे आरोप करणाऱ्या पत्रकार परिषदेचा संदर्भ याचिकाकर्त्यांनी दिला होता. त्यावर न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सोमवारी निकाल दिला. निकाल देताना खंडपीठाने सांगितले की, “आम्ही याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे आणि या याचिकेवर सुनावणी घ्यावी, असे आम्हाला वाटत नाही. याचिकाकर्त्यांची इच्छा असल्यास ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात.”
त्यावर, आपण निवडणूक आयोगाकडे आधीच अर्ज दाखल केला आहे, पण तो स्वीकारला गेला नाही असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. तसेच, निवडणूक आयोगाने आपल्या याचिकेवर निर्णय देण्यासाठी त्यांना काही मुदत आखून द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. ही विनंती न्यायालयाने फेटाळली आणि ॲड. पांडे यांना योग्य कायदेशीर उपाययोजना करण्यास सांगितले.