Skeleton Found in House हैदराबादमध्ये काहीजण क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळता खेळता त्यांचा चेंडू एका बंद घराच्या दिशेने उडाला. हा चेंडू शोधण्यासाठी एक तरुण गेला होता. तो चेंडू शोधत असताना त्याने सहज घरात डोकावून पाहिलं, तेव्हा त्यालाा मानवी सांगाडा जमिनीवर पडल्याचं आढळून आलं. ज्यामुळे त्याची भीतीने गाळण उडाली. त्याने धावत येऊन त्याच्या मित्रांना हा प्रकार सांगितला. ज्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं या संबंधीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
सात वर्षांपासून बंद होतं घर
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार हा मानवी सांगाडा अशा घरात मिळाला आहे जे मागच्या सात वर्षांपासून बंद होतं. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली आहे. तसंच हा सांगाडा कुणाचा आहे ? याचीही चर्चा रंगली आहे. एका स्थानिक तरुणाने क्रिकेटचा बॉल या घराच्या आवारात हरवला म्हणून शोधण्यासाठी या घराच्या आवारात प्रवेश केला. त्यावेळी तिथे त्याला मानवी सांगाडा आढळून आला. जे पाहून भीतीने त्याची गाळण उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा सांगाडा तोंडावर पडलेल्या अवस्थेत घरात पडला होता. जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात एक कवटी आणि काही हाडं दिसत आहेत. या सांगाड्याच्या आसपास भांडीही पडलेली दिसून येत आहेत. हे घर सात वर्षांपासून बंद आहे त्यामुळे हा सांगाडा कुणाचा आहे हे सांगणंही कठीण आहे. घटनास्थळावरुन जे पुरावे सापडले आहेत त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत. मानवी सांगाडा फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. हैदराबादच्या या घटनेने पोलीसही काहीसे चक्रावून गेले आहेत.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बंद घरात मानवी सांगाडा आढळला ते घर मुनीर खान नावाच्या एका व्यक्तीचं होतं. मुनीर खानला दहा मुलं होती. त्यातला चौथ्या क्रमांकाचा मुलगा या घरात राहात होता ज्याचं वय साधारण ५० वर्षे होतं. तो अविवाहित होता आणि त्याचं मानसिक संतुलन ढळलेलं होतं. कदाचित हा सांगाडा त्याचाच असावा असा अंदाज आहे. मात्र अद्याप आम्ही निष्कर्षापर्यंत पोहचलेलो नाही.
घराचा मालक विदेशात राहात असल्याची पोलिसांची माहिती
पोलिसांनी म्हणाले घरात जो माणसाचा सांगाडा आम्हाला आढळून आला आहे त्यावरुन त्याची हत्या केली असावी असा कुठलाही पुरावा अद्याप आढळलेला नाही. घटनास्थळी रक्ताचे डागही आढळून आलेले नाहीत. या प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल येईल त्याचवेळी बाकीच्या गोष्टी स्पष्ट होतील. ज्या घरात हा सांगाडा आढळला ते घर सात वर्षांपासून बंद आहे. या घराचा मालक विदेशात राहतो असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.