पृथ्वीपासून ३ कोटी प्रकाशवर्षे दूर अंतरावर एक फिकट निळी दीर्घिका सापडली असून ती लिओ मायनॉर (सिंह) तारकासमूहात आहे. नवीन संशोधनानुसार या दीर्घिकेमुळे विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी बरीच माहिती मिळू शकते. या दीर्घिकेचे नाव लिऑनसिनो म्हणजे लहान सिंह असे ठेवले आहे. या दीर्घिकेत जड मूलद्रव्यांचे प्रमाण कमी आहे. इंडियाना विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी ही दीर्घिका शोधली असून त्यांच्या मते तेथील धातू हे जड नाहीत. गुरुत्वीय बलाने बांधलेली ही दीर्घिका असून त्यात धातू नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्यामुळे बिगबँग म्हणजे महाविस्फोट सिद्धांताची संख्यात्मक चाचणी यात करता येईल असे इंडियाना विद्यापीठाच्या ब्लूमिंग्टन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स या संस्थेचे प्राध्यापक जॉन जे सालझर यांनी सांगितले. कमी धातू असलेली ही दीर्घिका असून महाविस्फोटाचा शोध घेण्याचे ती एक साधन बनू शकते. या सिद्धांताच्या सिद्धतेसाठी फार कमी मार्ग आहेत. सध्याच्या प्रारूपानुसार विश्वाचा जन्म झाला त्यावेळी हेलियम व हायड्रोजन यांचे अस्तित्व होते. धातूंचा अभाव किंवा प्रमाण कमी असलेल्या दीर्घिकातील अणूंमध्ये जर गुणोत्तर बघितले तर त्यावरून काही निष्कर्ष काढता येतात. ही दीर्घिका पृथ्वीपासून फार दूर आहे. ताऱ्यांच्या निर्मितीवेळी जड मूलद्रव्ये तयार होत असतात. आपल्या आकाशगंगेतही ती आहेत. कमी धातू असलेल्या दीर्घिका हे कमी तारकीय निर्मितीचे निदर्शक असते व त्याची तुलना इतर दीर्घिकांशी करता येते असे अॅलेक हिरशॉअर यांनी अॅस्ट्रॉफिजिकल जर्नलमधील शोधनिबंधात म्हटले आहे. स्थानिक विश्व असा एक भाग पृथ्वीपासून १ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे असे मानले जाते व त्यात लाखो दीर्घिका आहेत, लिऑनसिनो ही दीर्घिका कमी जड असलेली मूलद्रव्ये असल्याने वेगळी मानली जात आहे व ती या स्थानिक विश्वात आहे. बटू दीर्घिका असलेली लिऑनसिनो १००० प्रकाशवर्षे व्यासाची असून त्यात लाखो तारे आहेत. आपल्या आकाशगंगेत २०० ते ४०० अब्ज तारे आहेत त्यामुळे या निळ्या गूढ दीर्घिकेच्या माध्यमातून नवीन माहिती हाती लागण्याची शक्यता सालझर यांनी व्यक्त केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2016 रोजी प्रकाशित
फिकट निळ्या दीर्घिकेच्या माध्यमातून महाविस्फोट सिद्धांतावर संशोधन
पृथ्वीपासून ३ कोटी प्रकाशवर्षे दूर अंतरावर एक फिकट निळी दीर्घिका सापडली

First published on: 15-05-2016 at 01:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small blue galaxy could shed new light on big bang