भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू २३ एप्रिलपासून आंदोलन करत आहे. यावरून काँग्रेसने बुधवारी ( ३१ मे ) महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसने स्मृती इराणी हरवल्याचं म्हटलं आहे. यावरून इराणी यांनीही काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यावर स्मृती इराणी यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आहे. यावरूनच काँग्रेसने दोन ट्वीट करत टीका केली आहे. पहिल्या ट्वीट मध्ये स्मृती इराणी यांचा फोटो ट्वीट करत 'हरवल्याचं' काँग्रेसने सांगितलं आहे. तसेच, दुसऱ्या ट्वीटमध्ये महिला कुस्तीपटूंच्या प्रश्नांवर स्मृती इराणी ट्वीट लपवतात. तर केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी पळून जातात, असं टीकास्र काँग्रेसने डागलं आहे. स्मृती इराणी यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देत राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यावरून निशाणा साधला. ट्वीट करत इराणी म्हणाल्या की, "हे दिव्य राजकीय प्राणी, मी नुकतेच सिरसिरा गाव, विधानसभा सलून, लोकसभा अमेठी येथून धुरनपूरकडे निघाले आहे. माजी खासदार शोधत असाल, तर कृपया अमेरिकेशी संपर्क साधा," असा टोला इराणी यांनी राहुल गांधींना लगावला आहे. दरम्यान, मंगळवारी कुस्तीगिरांनी आपली पदके गंगेमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया हे कुस्तीगीर संध्याकाळी पदकांसह हरिद्वारच्या गंगा काठावर पोहोचले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो पाठिराखेही हरिद्वारला पोहोचले होते. कुस्तीगीर तासभराहून अधिक काळ पदके हातात धरून बसले होते. प्रत्येकाच्या डोळय़ात अश्र होते. त्यामुळे वातावरण भावनात्मक झाले होते. या वेळी भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी मध्यस्थीकरून कुस्तीगीरांना पदक विसर्जित करण्यापासून रोखले. टिकैत यांनी कुस्तीगीरांची समजूत काढली आणि त्यांच्याकडून पदके आपल्याकडे घेतली. त्यानंतर सरकारला ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देत असल्याचे कुस्तीगिरांनी जाहीर केले.