Sneha Debnath : १९ वर्षांची स्नेहा देबनाथ ही त्रिपुरामधली मुलगी दिल्लीतून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी तातडीने लक्ष घातलं असून पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. स्नेहा देबनाथ ही मुलगी कथित रुपाने बेपत्ता झाली आहे, याची दखल मुख्यमंत्री साहा यांनी घेतल्याचं त्यांच्या कार्यालयानेही म्हटलं आहे. पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
नेमकी काय घडली घटना?
स्नेहा देबनाथ या विद्यार्थिनीचा तिच्या कुटुंबाशी ७ जुलैला संपर्क झाला होता. त्यानंतर ती बेपत्ता झाली आहे. तिच्या आईने दिलेल्या माहितीनुसार ती सराय रोहिल्ला या रेल्वे स्थानकाच्या दिशेने चालली होती. तिने ७ जुलैच्या सकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी आईला फोन करुन ही माहिती दिली होती. तिच्याशी संपर्क होत नसल्याने तिचं कुटुंब चिंतेत आहे. दरम्यान या प्रकरणात पकडण्यात आलेल्या एका कॅब चालकाने हे सांगितलं आहे की सिग्नेचर पूल या भागात त्याने स्नेहाला सोडलं होतं. हा भाग असा आहे की तिथले सीसीटीव्ही कायमच खराब झालेले असतात. खराब सीसीटीव्ही फुटेज असलेल्या भागात स्नेहा का गेली? सीसीटीव्ही फुटेज का खराब होतं असे अनेक प्रश्न या सगळ्या प्रकरणाच्या भोवती फिरत आहेत. त्यामुळे स्नेहाच्या शोधकार्यात पोलिसांना अडचणीही येत आहेत.
९ जुलैला काय घडलं?
स्नेहाशी संपर्क होत नसल्याची माहिती समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने एनडीआरएफच्या मदतीने सिग्नेचर पूलाजवळ आणि या पुलाच्या सात किमीच्या परिघ क्षेत्रात जोरदार शोध मोहीम राबवली. मात्र त्यांच्या हाती कुठलाही ठोस पुरावा किंवा सुगावा लागला नाही. दरम्यान स्नेहाचं कुटुंब प्रचंड चिंतेत आहे. स्नेहा कुठलंही सामान न घेता गेली होती आणि तिचा काहीही पत्ता लागलेला नाही. मागच्या चार महिन्यांत तिने पैसेही काढलेले नाहीत असंही तिच्या कुटुंबाने स्पष्ट केलं. दरम्यान त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर स्नेहा देबनाथला शोधण्याची मोहीम आणखी वेगाने सुरु करण्यात आली आहे.
स्नेहाच्या आईने नेमकं काय म्हटलं आहे?
७ जुलैच्या सकाळी स्नेहाचा मला फोन आला. आमचं बोलणं झालं. त्यानंतर मी सकाळी पावणेनऊच्या सुमाारास तिला पुन्हा फोन केला. तेव्हा तिचा फोन स्विच ऑफ लागला. त्यानंतर आम्ही तिच्या मित्राकडे, मैत्रिणींकडे चौकशी केली. त्यावेळी आम्हाला समजलं की स्नेहाला कुणीही त्या सकाळी भेटलं नव्हतं. फक्त एक कॅब चालकच होता ज्याने स्नेहाला सिग्नेचर पूलाजवळ सोडलं होतं. त्या ठिकाणचा एकही सीसीटीव्ही चालत नाही तरीही स्नेहा त्या ठिकाणी उतरली. त्यामुळे आता स्नेहा तिथून नेमकी कुठे गेली? हा आमच्यापुढेही मोठा प्रश्न आहे. तिला लवकरात लवकर शोधण्यात यावं असंही तिच्या आईने म्हटलं आहे.