Chhatrapati Shivaji Maharaj Janmotsav : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज देशभर उत्साहात साजरी करण्यात आली. तसंच, काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळही भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. हिमवर्षावात देखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष दुमदुमला.

कुपवाडा येथील भारत-पाक सीमेजवळ गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली. कुपवाडा येथे उणे तापमानात हा अनोखा कार्यक्रम झाला. सभोवताली सर्वत्र बर्फ अशा कठीण परिस्थितीतही आपल्या जवानांनी महाराजांना जयंती दिनी केलेले अभिवादन पाहून अभिमान वाटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, त्यांचे मनोबल उंचावत राहील, असे मुख्यमंत्री पुतळा अनावरण समारंभात म्हणाले होते. त्याची प्रचिती आज दिसून आली. आम्ही पुणेकर संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून पुतळ्यासाठी भक्कम पाया केला होता.