पीटीआय, कोटय़म (केरळ) : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यां मेरी रॉय (वय ८९) यांचे गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. रॉय यांच्या कायदेशीर लढाईमुळे सीरियन ख्रिश्चन महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार मिळाला. त्या प्रसिद्ध लेखिका आणि बुकर पुरस्कार विजेत्या अरुंधती रॉय यांच्या आई असून पल्लीकूदम शाळेच्या संस्थापक आहेत.

 अंतिम दर्शनासाठी रॉय यांचे पार्थिव गुरुवारी दुपारी दोन ते रात्री नऊ वाजतादरम्यान पल्लीकूदम शाळेच्या आवारात ठेवण्यात आले होते, तर शुक्रवारी, २ सप्टेंबरला सकाळी सात ते दुपारी दोनदरम्यान एमआर ब्लॉक येथे त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. दुपारी दोननंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 रॉय यांनी १९८० च्या दशकात केरळमधील सीरियन ख्रिश्चन परिवारातील वडिलोपार्जित मालमत्तेत महिलांना समान अधिकार देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात लढा सुरू केला होता. उच्च न्यायालयाने १९८६ मध्ये एक ऐतिहासिक निर्णय देत त्यांची याचिका मंजूर केली होती. त्यानंतर त्रावणकोर राज्याचा १९१६ चा त्रावणकोर उत्तराधिकारी कायद्यातील तरतुदी बदलून सर्वोच्च न्यायालयाने सीरियन ख्रिश्चन परिवारातील महिलांना त्यांच्या पित्याच्या संपत्तीत समान अधिकार आहे, असा निर्णय दिला. हे प्रकरण भारतीय कायद्याच्या इतिहासात ‘मेरी रॉय केस’ म्हणून ओळखण्यात येते.

मेरी रॉय यांचा जन्म १९३३ मध्ये कोटय़मजवळच्या एका प्रसिद्ध ख्रिश्चन परिवारात आयमाननमध्ये झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीत तर, चेन्नईतील एका महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. त्यांनी कोलकाता येथील एका कंपनीत सचिव म्हणून काम केले. याचदरम्यान त्यांचा विवाह रजीब रॉय यांच्या बरोबर झाला. १९६७ मध्ये त्यांनी पल्लीकूदम शाळेची स्थापना केली.

मुख्यमंत्री  पिनराई विजयन आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व्ही. डी. सतीशन यांनी रॉय यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. विजयन यांनी सांगितले की, मेरी यांनी शिक्षण आणि महिलांच्या हितासाठी मोठे योगदान दिले आहे.

बदलाचा पर्याय म्हणून ‘आप’मध्ये प्रवेश..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेरी रॉय या सामाजिक मुद्दय़ांवर हिरिरीने बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध होत्या. विशेषत: लैंगिक समानतेसाठी त्यांचा संघर्ष उल्लेखनीय समाजण्यात येतो. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी आम आदम पार्टीमध्ये प्रवेश केला होता. ‘काँग्रेस, भाजप आणि डावे पक्ष बदल घडवून आणण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या पक्षाकडे एक पर्याय म्हणून पाहते,’ असे त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश करताना स्पष्ट केले होते.