वकील या नात्याने एका खटल्यात सहभागी होताना पुरावे नष्ट करण्याचा ठपका न्यायालयाने ठेवल्याने दिल्लीचे विधिमंत्री सोमनाथ भारती यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस आणि भाजपने केली आहे. तथापि, याबाबत न्यायालयाचा गैरसमज झाल्याची सारवासारव करीत आम आदमी पार्टी (आप) आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारती यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत.
भारती यांचे अशील पवनकुमार आणि स्वत: भारती यांचे ऑगस्ट २०१३ मधील एका खटल्यातील वर्तन केवळ आक्षेपार्हच नव्हते तर ते पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यासारखे होते, असा ठपका विशेष सीबीआय न्यायाधीश पूनम बांबा यांनी भारती यांच्यावर ठेवल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
एका बँक घोटाळ्यात लाचखोरी केल्याचा आरोप असलेले पवनकुमार यांना मंजूर करण्यात आलेला जामीन रद्द करताना न्यायालयाने वरील निरीक्षणे नोंदविली आहेत. भारती आणि पवनकुमार यांनी या खटल्यातील सरकारी पक्षाच्या साक्षीदाराशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे हे आक्षेपार्ह आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
भारती पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात असल्याचे पतियाळा हाऊस न्यायालयात सिद्ध झाले असून न्यायमूर्तीनीही हे निरीक्षण नोंदविले आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील जनतेने भारती यांच्या राजीनाम्याची मागणी करावी आणि अरविंद केजरीवाल हे नीतिमत्तेच्या गोष्टी करीत असतील तर त्यांनी भारती यांची हकालपट्टी करावी, असे दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.