Sonam Raghuvanshi Case Updates: मेघालयात हनिमूनदरम्यान पती राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम रघुवंशी १० दिवसांपेक्षा जास्त काळ इंदूरमधील एका फ्लॅटमध्ये राहिली असल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनम ज्या फ्लॅटमध्ये राहिल्याचा संशय आहे, त्या फ्लॅटची मंगळवारी शिलाँग पोलिसांच्या पथकाने झडती घेतली.
ताब्यात घेतलेल्या पाच संशयित आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी आणि संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी शिलाँग पोलिसांनी इंदूरमधील आग्रा-मुंबई रोडवरील देवास नाकाजवळील फ्लॅटला भेट दिली. तपासणीदरम्यान त्यांनी कोणत्याही आरोपीला सोबत आणलेले नव्हते.
राजाच्या हत्येनंतर सोनम प्रियकर राज कुशवाहाबरोबर या ठिकाणी राहिली होती. ७ जून रोजी सोनमने हा फ्लॅट सोडला होता. पोलिसांना या फ्लॅटमधून काही कपडे आणि काही भांडी वगळता कोणतेही महत्त्वाचे पुरावे मिळालेले नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांना असा संशय आहे की सोनमने हा फ्लॅट सोडण्यापूर्वी तिच्या वास्तव्याचे पुरावे काळजीपूर्वक पद्धतीने नष्ट केले आहेत.
दरम्यान, २३ मे रोजी पती राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनम बेपत्ता झाली होती. त्यानंतर ती जवळजवळ २,२०० किमी प्रवास करून २५ ते २७ मे दरम्यान शांतपणे इंदूरला गेली, जिथे तिचा प्रियकर राज कुशवाहाने तिच्यासाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
राजाचे दागिने, सोनमचे फोन अजूनही गायब
२ जून रोजी पती राजा रघुवंशीचा मृतदेह दरीत सापडला तेव्हा सोनम इंदूरमध्ये होती, असा पोलिसांचा संशय आहे. पण सोनमही बळी पडल्याच्या भीतीने शिलाँग पोलिस आणि स्वयंसेवकांनी तिला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.
दरम्यान, सोनमचे दोन मोबाईल फोन, पती राजाचे दागिने आणि प्रियकर राज कुशवाहाने तिला दिलेला फोन अजूनही गायब आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर तिचे फोन आणि सिम कार्ड दोन्ही तोडले होते.
या दरम्यान तिने प्रियकर राजने दिलेल्या फोनचा वापर केला असला तरी, इंदूरचा फ्लॅट सोडल्यानंतर तिने इंदूर ते १००० किमी अंतरावर असलेल्या यूपीमधील गाझीपूरपर्यंत कोणत्याही मोबाईलशिवाय प्रवास केला होता, असे पोलिसांनी सांगितले.
“शिलाँग पोलिसांनी शोध घेतलेल्या ठिकाणांसह इतर काही ठिकाणी भेट देण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. यानंतर आम्ही त्यांना एक पथक उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती आम्हाला दिलेली नाही,” असे इंदूरचे पोलीस उपाधीक्षक राजेश त्रिपाठी म्हणाले.