Sonam Raghuvanshi : मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या राजा रघुवंशीचं आणि सोनमचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. दोघंही २० मे रोजी मधुचंद्राला गेले. त्यानंतर सोनमने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने राजाची हत्या केली. सुरुवातीला हे जोडपं बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. त्यानंतर या प्रकरणात हत्येचा संशय पोलिसांना आला होता. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपासाची चक्रं फिरवली. ज्यानंतर सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहाला अटक झाली. या घटनेनंतर ८ जूनच्या रात्री सोनमही पोलिसांना शरण आली. हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता सोनमबाबत नवी माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील एका महिलेने सोनमबाबत काय सांगितलं?
सोनमने पोलिसांना शरण जाण्याचया काही तास आधी उत्तर प्रदेशसाठी बसने प्रवास केला होता. उजला यादव या महिलेच्या बाजूच्या सीटवर सोनम बसली होती. उजला यादव ही महिला न्यूज रिल आणि राजा रघुवंशीच्या बातम्या बघत होती. त्यावेळी सोनमने तिला सांगितलं की हे सगळं बकवास आहे पाहू नकोस. उजला यादव या विद्यार्थिनीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं.
उजला यादवच्या बाजूला बसून सोनमचा गाझीपूरपर्यंत प्रवास
उजला यादव ही गाझिपूरची विद्यार्थिनी आहे. सोनम रघुवंशी माझ्या बाजूलाच बसली होती. वाराणसीहून ती बसमध्ये बसली. ती माझ्या बाजूच्याच सीटवर बसली होती. तिने दुपट्ट्याने तिचा चेहरा झाकला होता. तिच्याबरोबर दोन पुरुषही होते. त्यातल्या एकानेही चेहरा रुमालासारख्या कापडाने झाकला होता अशी माहितीही उजलाने दिली. उजला गाझीपूरला तिच्या घरी चालली होती. गाझीपूरला कसं जायचं याबाबत सोनमने विचारलं होतं तेव्हा उजलानेच तिला सांगितलं होतं की ही बस गाझीपूरला जाते. गाझीपूरला हे तिघंही उतरले असंही उजलाने सांगितलं. उजलाने सांगितल्यानुसार सोनमने तिला हे तू कशाला पाहतेस असं म्हणत हटकलं होतं आणि राजा रघुवंशीविषयीच्या बातम्या पाहणं बंद कर हे सगळं बकवास आहे असंही म्हटलं होतं. उजलाने दिलेल्या माहितीनुसार सोनमने तिचा फोनही मागितला होता. मला एक फोन करायचा आहे फोन देशील का? असं ती म्हणाली होती तिने नुसताच नंबर टाइप केला पण नंतर तो डायल केलाच नाही मला फोन करत केला असं उजलाने सांगितलं. तिने माझ्याकडे पाणीही मागितलं होतं.
व्हिडीओ पाहात असताना नेमकं काय घडलं?
उजलाच्या सांगण्यानुसार, ती हेडफोन लावू राजा रघुवंशीबाबतच्या बातम्या बघत होती. राजा रघुवंशीची आई म्हणत होती की माझा मुलगा तर गेला आता सून सुखरुप घरी यावी अशी अपेक्षा आहे. हे पाहात असतानाच सोनम तिच्या अंगावर ओरडली. हे काय बकवास पाहते आहेस बंद कर ते आधी असं सोनम तिला म्हणाली. ज्यानंतर उजलाने फोनवरचे ते व्हिडीओ बंद केले. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
सोनमच आपल्या बाजूला बसली होती हे उजलाने कसं ओळखलं?
सोनमच आपल्या बरोबर होती हे उजलाने नंतर ओळखलं. सोनमचा व्हायरल झालेला फोटो उजलाने टीव्हीवर आणि मोबाइलवर पाहिला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की ही सोनमच आहे. त्यानंतर उजलाने पोलिसांना आणि राजा रघुवंशीच्या कुटुंबाला फोन केला होता. सोनम आणि राजा रघुवंशीची लग्न पत्रिका व्हायरल झाली होती त्यात असलेल्या क्रमांकावर तिने संपर्क साधून ही माहिती दिली होती.