Sonam Raghuvanshi Burqa Story: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या हत्या प्रकरणामुळं देशभरात खळबळ माजली असून अतिशय थंड डोक्यानं केलेल्या गुन्ह्याचे पुरावे बाहेर येत आहेत. राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर जवळपास १५ दिवसांनी सोनम गाझीपूरमधील एका धाब्यावर आढळून आली होती. तिला इंदूर ते गाझीपूर सोडणाऱ्या वाहन चालकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालकानं दिलेल्या महितीनुसार, सोनम पूर्ण प्रवासात बुरखा घालून बसली होती. तसेच वाहन वारंवार थांबवून ती खाली उतरून कुणाशी तरी फोनवर बोलत होती. चालकानं पोलिसांना काय काय सांगितलं ते पाहू.
सोनम रघुवंशी सध्या सहआरोपी राज कुशवाहा बरोबर शिलाँग पोलिसांच्या अटकेत आहे. शिलाँग पोलिसांचे पथक राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांनी इंदूरमधून मोहित आणि पियुष नावाच्या चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ज्यांनी तिला इंदूरपासून उत्तर प्रदेशमध्ये सोडलं होतं.
स्थानिक ट्रॅव्हल एजन्सीसाठी काम करणारा मोहित गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर झाला. त्यानं सांगितलं की, पियुषचं वाहन राजनं भाड्यानं घेतलं होतं. ८ जून रोजी सोनमनं प्रवासाची सुरुवात केली. तेव्हा मेघालयमध्ये राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून सहा दिवस झाले होते. त्यावेळी मेघालय पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवक सोनमला शोधण्यासाठी जंगलात खराब हवामानाचा सामना करत शोधमोहिम राबवत होते.
पियुषने चौकशीत सांगितले की, सोनमनं बुरखा घातला होता. १००० किमीच्या प्रवासादरम्यान सोनम एकदाही जेवणासाठी थांबली नाही. त्याच रात्री ते वाराणसी येथे पोहोचले. ९ जून रोजी पहाटे वाराणसीपासून ९० किमी अंतरावर असलेल्या गाझीपूरमधील एका ढाब्यावर सोनम आढळून आली. ढाबा मालकाकडून तिनं फोन घेऊन आपल्या भावाला पहिल्यांदा माहिती दिली. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत इंदूर येथे सहा जणांची चौकशी करण्यात आली आहे.
दरम्यान राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशीने या प्रकरणात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. थंड डोक्यानं अत्यंत क्रूरपणे राजाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे मारेकऱ्यांना अद्दल घडेल आणि एक उदहारण प्रस्थापित होईल, अशी शिक्षा दिली जावी, अशी मागणी विपिनने केली.
या प्रकरणातील आरोपी सोनम, राज कुशवाह, विशाल चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांना शिलाँगच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने सोनम आणि राज यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. तर विकी, आकाश आणि आनंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.