काँग्रेस पक्षासाठी धर्मनिरपेक्षता केवळ निवडणुकीपुरता मुद्दा नाही; तर धर्मनिरपेक्षतेवर आमची आस्था आहे. त्यामुळे समाजात फूट पाडणाऱ्या धर्माध शक्तींविरोधात आमचा लढा कायम सुरू राहील, अशी ग्वाही देत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर तोफ डागली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका न करता केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा पाढा वाचला. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा निर्णय राहुल गांधीच घेतील, असे त्यांनी या वेळी सांगितले.
राहुलयांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित न करता प्रचार समितीचे प्रमुखपद सोपविण्याची घोषणा गुरुवारी झाली होती. त्याचे पडसाद आज उमटले. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. आपल्या २० मिनिटांच्या भाषणात सोनिया गांधी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दय़ावर जोर दिला. समाजात फूट पाडणाऱ्या विचारधारेशी आमचा लढा असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.
‘फूट पाडणारी विचारधारा’ असा उल्लेख करीत असताना सोनिया गांधी यांनी धर्माचा उल्लेख करण्याचे सोयीस्कर टाळले. त्या म्हणाल्या की, धर्माध शक्तीच देशापुढील प्रमुख आव्हान आहे. त्याविरोधात काँग्रेसचा गेल्या कित्येक वर्षांपासून लढा सुरू आहे. विरोधी पक्ष (भाजप) देशात धर्माच्या नावावर फूट पाडतात. मुखवटा चढवून काही जण देशात हिंसा पसरवतात. चार राज्यांत झालेल्या दारुण पराभवाचा थेट उल्लेख टाळत सोनिया म्हणाल्या की, निवडणूक म्हटली की हार-जीत येणारच. काँग्रेसला अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. सोनिया गांधींनी प्रारंभी इंग्रजी व त्यानंतर हिंदीत भाषण केले.
    पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ प्रभावी ठरल्याचे ठोस प्रतिपादन करून सोनिया गांधी म्हणाल्या की, देशाच्या विकासासाठी काँग्रेसच कारणीभूत आहे. काँग्रेसच्या धोरणांमुळे ग्रामीण भारतात मोठे परिवर्तन झाले. यामुळे काँग्रेसकडून अपेक्षा बाळगणारा नवा मध्यमवर्ग अस्तित्वात आला. या अपेक्षा पूर्ण करण्यात काँग्रेस कधी यशस्वी ठरला तर कधी अपयश आले. परंतु जोपर्यंत दारिद्रय़ संपणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.     
 सामान्य कार्यकर्त्यांना वाटणारी अस्वस्थता सोनिया गांधी यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. निवडणूक म्हटले की जय-पराजय आलाच. परंतु अशा वेळी कधीही हार न मानणारे कार्यकर्तेच पक्षाला जिंवत ठेवतात. प्रत्येकाने आता संघर्षांला तयार राहा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी करताच टाळ्यांच्या कडकडाट झाला.

पक्षासाठी कठीण काळ; संघर्षांसाठी तयार राहा
काँग्रेस अधिवेशनात सकाळपासूनच राहुल गांधी यांचीच चर्चा सुरू होती. अनेक नेत्या-कार्यकर्त्यांनी राहुल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित न करता प्रचार समितीचा प्रमुख केल्याने नाराजीचा सूर लावला. सोनिया गांधी यांचे भाषण संपताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘राहुल-राहुल’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. घोषणा थांबत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी माईकचा ताबा घेत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही कार्यकर्ते ऐकेनात. अखेरीस राहुल यांनीच माईकवर जाऊन कार्यकर्त्यांना शांत बसण्याचे आवाहन केले. दुपारच्या सत्रात तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देईन, असे सांगितल्यावर गोंधळ थांबला.

सोनिया उवाच..
* काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आजपर्यंत अविरत मेहनत घेतली आहे.
* खोट्या आरोपांनंतरही काँग्रेसने देशाच्या विकासात कोणताही खंड निर्माण होऊ दिला नाही
* आपल्या सर्वांचा संकल्प एकच असेल, सर्वांचे कर्मही एकच असेल आणि या लढाईत आपला विजय होईल
* अनेक टीकांना खंबीरपणे सामोरे जात न डगमगता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाची विकास उद्दीष्टे गाठली आहेत
* खचणे काँग्रेसला माहित नाही. अनेक संकटे काँग्रेसने आतापर्यंत पचवली आहेत
* मला आशा नाही विश्वास आहे. पुढील निवडणुकीत काँग्रेसचाच विजय