एपी, सेऊल
दक्षिण कोरियाचे नवे अध्यक्ष ली जाय-म्युँग यांनी बुधवारी उत्तर कोरियाबरोबर थांबलेला संवाद पुन्हा सुरू करण्याची आणि अमेरिका-जपानशी संबंध आणखी दृढ करण्याची ग्वाही दिली. पाच वर्षांच्या कार्यकाळातील धोरणांची दिशा त्यांनी बुधवारी स्पष्ट केली.
गरीब घरात जन्माला आलेले ली अथक संघर्ष करून दक्षिण कोरियाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार बुधवारी स्वीकारला. असमानता, भ्रष्टाचार याविरुद्ध लढू, असे ते म्हणाले. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येऊल यांना पदच्युत केल्यानंतर ली दक्षिण कोरियाचे अध्यक्ष झाले आहेत. दक्षिण कोरियाच्या संसदेत त्यांचे भाषण झाले. उत्तर कोरियाचा आण्विक धोका आणि लष्करी आक्रमकता यांचा सामना करू. मात्र, उत्तर कोरियाशी संवादाचा मार्ग पुन्हा प्रस्थापित करू, असे ते म्हणाले.
शेजारी देशांबरोबर व्यावहारिक पातळीवर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याबरोबरच दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान यांचे संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.