टू जी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदावरून कॉंग्रेसचे नेते आणि खासदार पी. सी. चाको यांना हटविण्याची विरोधकांची मागणी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी गुरुवारी फेटाळली. समितीतील सदस्यांनी अध्यक्षांसोबतचे मतभेद त्यांच्याशी चर्चा करून दूर करावेत, असाही सल्ला मीराकुमार यांनी दिला आहे.
संसदीय कामाकाजाच्या नियमावलीतील तरतुदींच्या आधारे चाको यांना समितीच्या अध्यक्षपदावरून हटविणे अवघड असल्याचे मीराकुमार यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळेच समितीचे सदस्य आणि अध्यक्ष यांनी आपापसातील मतभेद मिटवून आपला अहवाल सभागृहाकडे सादर करावा, असे मीराकुमार यांनी स्पष्ट केले.
टू जी घोटाळ्याची चौकशी करणाऱया संयुक्त संसदीय समितीच्या अहवालातील माहिती माध्यमांना मिळाल्यानंतर चाको यांना पदावरून हटविण्याची मागणी समितीतील कॉंग्रेसव्यतिरिक्त विरोधी पक्षातील सर्व सदस्यांनी केली होती.