निवडणुकीआधी शपथविधीची तारीख जाहीर करणाऱ्या येडियुरप्पांना शत्रुघ्न सिन्हांकडून विशेष शुभेच्छा

येडियुरप्पांचे विशेष अभिनंदन आणि ज्यांनी निवडणुकीसाठी कठोर मेहनत घेतली त्यांचेही अभिनंदन, विजयी कर्नाटका, जय हिंद, असे ट्विट त्यांनी केले आहे.

खासदार व प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा

आपल्याच पक्षाविरोधात भाष्य करून नेहमी चर्चेत असणारे भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कर्नाटकात भाजपाला बहुमत गाठता आलेले नाही. त्यातच काँग्रेस-जेडीएस यांना जागा कमी मिळूनही त्यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केल्याने भाजपासमोर पेच पडला आहे. त्यातच शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपावर उपहासात्मक भाष्य करून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपा, काँग्रेस, जेडीएसचे अभिनंदन करताना भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांना टोलाही लगावला. निवडणूक जिंकण्याआधी आपल्या शपथविधीची तारीख जाहीर करणाऱ्या येडियुरप्पांचे विशेष अभिनंदन आणि ज्यांनी निवडणुकीसाठी कठोर मेहनत घेतली त्यांचेही अभिनंदन, विजयी कर्नाटका, जय हिंद, असे ट्विट त्यांनी केले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या वक्तव्याचा दाखल देत सिन्हा म्हणाले की, आमच्या अत्यंत आवडत्या आणि खरा जनाधार असलेल्या ‘मासूम वैज्ञानिक’ ममता बॅनर्जींनी आधीच जाहीर केले होते की, येडियुरप्पा किंवा सिद्धरामय्याही (सिद्धरूपय्या) हे दोघे नाही तर फक्त कुमारस्वामी हेच मुख्यमंत्री बनतील. आज तसंच झालंय. आता कर्नाटक निवडणुकीच्या निकालाला ‘जीत की हार’ किंवा ‘हार की जीत’ असे शीर्षक द्यावे लागेल, मान्य आहे ना, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

अखंड ऊर्जा असलेले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थंड डोक्याने रणनिती आखणारे पक्षाध्यक्ष अमित शाह यांचे हार्दिक अभिनंदन. अत्यंत प्रामाणिकपणे नेतृत्व करणारे राहुल गांधी आणि देवेगौडा यांचेही अभिनंदन. कुमारस्वामी यांचेही अभिनंदन ज्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत आपले पत्ते छुपे ठेवले, असे ट्विटही त्यांनी केले. शत्रुघ्न सिन्हा यांनी एकामागोमाग एक ट्विट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Special thanks to shatrughan sinha for yeddyurappa to announce the date of swearing in ceremony before the election