देशात २ वेगवेगळ्या ठिकाणी वेगानं धावणाऱ्या कार थेट दुर्गा माता मूर्ती विसर्जनाच्या कार्यक्रमात घुसल्यानं एकच खळबळ उडालीय. पहिली घटना छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात तर दुसरी घटना मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये घडलीय. जशपूरमध्ये भक्तगण दुर्गा मूर्ती विसर्जनाला जात असताना अचानक एका कार मिरवणुकीत घुसली. या अपघातात १ जणाचा मृत्यू, तर १६ जण जखमी झाले आहेत. भोपाळमध्येही मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत एका कार चालकाने उलट्या दिशेने वेगाने गाडी नेली. यात एक लहान मुल जखमी झालंय.

मध्य प्रदेशमधील घटनेत काय घडलं?

भोपाळमधील ही घटना बजारीया रेल्वे स्टेशनच्या क्रॉसिंगवर घडली. ही घटना घटनास्थळावर उपस्थितांनी कॅमेरात कैद केलीय. या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की आरोपी कारचालक उलट्या दिशेने गर्दीतून कार वेगाने चालवत आहे. या कारमध्ये २ लोक असल्याचंही दिसत आहे. यात मिरवणुकीतील नागरिकांना दुखापत झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी गाडीचा पाठलाग केला. मात्र, कारचालक पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही तपासून गाडीसह आरोपींची ओळख पटवण्याचं काम करत आहेत. लवकरच आरोपींना अटक केलं जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेत एक लहान मुल जखमी झालं आहे.

छत्तीसगडमधील घटनेत नेमकं काय घडलं?

जशपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मध्य प्रदेशमधील सिंग्रूली येथील रहिवासी बबलू विश्वकर्मा (२१) आणि शिशूपाल शाहू (२६) यांना या प्रकरणी अटक करण्यात आलीय. पथलगाव येथे आरोपींनी मिरवणुकीत गाडी घातल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण जखमी झालेत. या अपघातानंतर स्थानिकांनी गाडीचा पाठलाग करत मोडतोड केलीय.”

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. त्यात ही कार मिरवणुकीतील लोकांमधून वेगाने जाताना दिसत आहे. यानंतर मिरवणुकीतील नागरिकांनी गाडीचा पाठलाग केला आणि गाडी थांबवली. यावेळी संतप्त नागरिकांनी गाडीची मोडतोड देखील केलीय.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत ही घटना दुखद आणि ह्रदय पिळवटून काढणारी आहे, असी भावना व्यक्त केली. ही घटना शुक्रवारी (15 ऑक्टोबर) रोजी घडली.