कोलंबो : श्रीलंकेत दोन आठवडय़ांपासून लागू केलेली आणीबाणी  शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री हटवण्यात आली. देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारल्याने हा निर्णय घेण्यात आला.   देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे जीवनावश्यक वस्तू्ंच्या तीव्र टंचाईमुळे प्रचंड जनक्षोभ उसळल्याने सरकारविरोधी निदर्शने होत असल्याने आणीबाणी देशभर लागू करण्यात आली होती. अध्यक्ष गोतबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर महिनाभरात दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही आणीबाणी उठवण्यात आल्याचे अध्यक्षांच्या सचिवालयातर्फे जाहीर करण्यात आले.  काही दिवसांपासून सरकार समर्थक आणि विरोधकांत झालेल्या हिंसाचारात देशात नऊ जण मृत्युमुखी पडले असून, २०० जखमी झाले आहेत.

 भारतातर्फे  मदत

 भारताने शनिवारी श्रीलंकेला आणखी ४० हजार मेट्रिक टन डिझेल देऊ केले. ही मदत  कर्जसुविधेंतर्गत दिली गेली आहे. गेल्या महिन्यात भारताने श्रीलंकेस मदत म्हणून ५० कोटी डॉलरची अतिरिक्त कर्ज सुविधा इंधन आयातीसाठी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 कारण परकीय गंगाजळीच्या खडखडाटामुळे श्रीलंकेला आयात शुल्क देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या चलनाचे अवमूल्यन झाले असून, महागाई भडकली आहे. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार भारताने जीवनावश्यक वस्तूंचे एक जहाज श्रीलंकेला रवाना केले आहे. त्यात ९००० मेट्रिक टन तांदूळ, २०० मेट्रिक टन दूध पावडर, २४ मेट्रिक टन जीवनावश्यक औषधे वगैरेंचा समावेश आहे.