Former Sri Lankan President Ranil Wickremesinghe : श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी (२२ ऑगस्ट) अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रानिल विक्रमसिंघे यांनी पदावर असताना सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपा प्रकरणी चौकशीच्या संदर्भातील जबाब नोंदवण्यासाठी रानिल विक्रमसिंघे यांना सीआयडीने बोलावलं होतं. मात्र, चौकशीनंतर रानिल विक्रमसिंघे यांना सीआयडीने अटक केलं आहे.

माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या अटकेनंतर श्रीलंकेच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पण रानिल विक्रमसिंघे यांच्या अटकेची पोलिसांनी अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. मात्र, या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यावर झालेली ही कारवाई २२ आणि २३ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या एका खासगी परदेश दौऱ्याशी संबंधित आहे. या दौऱ्यात माजी राष्ट्रपतींसह दहा जणांचा समावेश असल्याची चर्चा आहे. माहितीनुसार, लंडनमधील एका विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी रानिल विक्रमसिंघे गेले होते. मात्र, हा त्यांचा खासगी दौरा होता, तरीही या दौऱ्यात कोट्यवधींचा सरकारी निधी खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे.

वृत्तानुसार, सीआयडीने यााआधी रानिल विक्रमसिंघे यांचे माजी सचिव त्यांचे खाजगी सचिव म्हणून काम करणाऱ्या सँड्रा परेरा यांचे जबाब नोंदवले होते. त्यानंतर मंगळवारी विक्रमसिंघे यांना सीआयडीकडून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, रानिल विक्रमसिंघे हे राष्ट्रपती असताना ते त्यांच्या पत्नींच्या सन्मानार्थ एका ब्रिटिश विद्यापीठात आयोजित समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी रानिल विक्रमसिंघे यांनी सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर आता अटकेची कारवाई झाल्याचं सांगितलं जात आहे. २०२२ मध्ये श्रीलंकेच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाच्या परिस्थितीत श्रीलंकेची अर्थव्यवस्था स्थिर करण्याचे श्रेय त्यांना जाते. मात्र, आता रानिल विक्रमसिंघे यांच्या अटकेच्या कारवाईनंतर श्रीलंकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.