पीटीआय, श्रीनगर

जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगर शनिवारी पहाटेच्या सुमारास स्फोटांच्या आवाजांनी हादरली. या घटनेनंतर शहरात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून अनेक ठिकाणी केलेले ड्रोन हल्ले उधळून लावल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली.

पहाटे झालेल्या स्फोटानंतर श्रीनगर विमानतळानजीक सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास दोन स्फोट झाले. यानंतर अनेक ठिकाणी सायरनचाही आवाज ऐकू आला. स्फोटांमुळे शहर आणि खोऱ्याच्या इतर भागात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.

ड्रोन हल्ले निष्प्रभ

पाकिस्तानने खोऱ्यातील महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शनिवारी काश्मीरमधील सुरक्षा दलांनी तीन ड्रोन पाडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या घटनेत, श्रीनगरमधील जुन्या विमानतळावर एका हवाई संरक्षण यंत्रणेने एक ड्रोन पाडला. हे विमानतळ ‘तांत्रिक’ विमानतळ म्हणूनही ओळखले जाते. यानंतर, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आणखी दोन ड्रोन पाडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पाटण भागातील हैदरबाग भागात सुरक्षा व्यवस्थेवर घिरट्या घालत असताना सुरक्षा दलांनी ही कारवाई केली, अशी माहिती देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हेही वाचा

दल सरोवरात क्षेपणास्त्राचे अवशेष!

शनिवारी सकाळी स्फोटांच्या आवाजानंतर श्रीनगरमधील पर्यटनस्थळ असलेल्या दल सरोवरात क्षेपणास्त्रसदृश वस्तू पडली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वेळी ही वस्तू पडली त्या वेळी सरोवराच्या पृष्ठभागावरून धूर येत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा दलांनी हे अवशेष बाहेर काढले असून त्याची तपासणी केली जात आहे. यासोबतच शनिवारी सकाळी शहराबाहेरील लसजन भागातही संशयास्पद वस्तू आढळून आली. असून त्याचीही तपासणी केली जात आहे.