लॉस एंजल्स : ‘दी सेव्हन इयर इच’ या १९५५ मधील सुपरहिट चित्रपटातील भूमिकेवर आधारित चितारण्यात आलेला अभिनेत्री मेरेलिन मन्रो हिचा पुतळा लेडीज ऑफ हॉलिवूड गाझेबो येथून चोरीस गेला आहे.
गाझेबोची निर्मिती १९९३ मध्ये झाली होती नंतर ते मन्रो हिला अर्पण करण्यात आले होते. विविध संस्कृतीतील महिलांच्या योगदानावर आधारित असे हे संग्रहालय आहे. यात डोलोरेस डेल रिओ, डोरोथे डँडरीद, मे वेस्ट, अॅना मे वाँग यांचेही पुतळे तेथे आहेत. हॉलिवूड बोलवार्ड व ला ब्रिया अॅव्हेन्यू जवळ एका कोपऱ्यात असलेला हा पुतळा सोमवारी पहाटे ३ वाजता चोरीस गेला असे दी लॉसएंजल्स टाइम्सने म्हटले आहे.
पोलिसांना एका नागरिकाने दूरध्वनी करून कुणीतरी गाझेबोवर रविवारी रात्री चढल्याची माहिती दिली होती. पण पोलिस तेथे गेले असता पुतळा तेथेच होता पण नंतर सोमवारी पहाटे मात्र हा पुतळा खरोखर चोरीस गेला. या पुतळ्याचे ठिकाण म्हणजे छायाचित्रकार व पर्यटकांचे आकर्षण आहे. हा पुतळा २५ वर्षे जुना होता. आता गुप्तहेर व फोरेन्सिक तज्ज्ञांनी चौकशीसाठी या ठिकाणाचा ताबा घेतला आहे. कुणीतरी उंचावर असलेला हा पुतळा करवतीने कापून नेला. अजून संशयितांची नावे समजली नसली, तरी संबंधितांच्या हाताचे ठसे मिळाले आहेत.