Pakistan online content banned: पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारताने एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानला दिलेले उत्तर आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रात सुरू असलेल्या उघड संघर्षामुळे तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आता सर्व ओटीटी आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सना निर्देश दिले आहेत की त्यांनी पाकिस्तानी कंटेंट ताबडतोब हटवावा.

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, “भारतात कार्यरत असलेल्या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आणि मध्यस्थांना सल्ला आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या वेब सीरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रिमिंग मीडिया कंटेंटला ताबडतोब हटवावे. मग ते सबस्क्रिप्शन असो किंवा इतर काही. ज्याची निर्मिती पाकिस्तानात झाली आहे, ते सर्व हटविण्यात यावे.”

याचा अर्थ नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, यूट्यूब, जियो सिनेमा आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पाकिस्तानच्या चित्रपट, वेबसीरीज, संगीत आणि गाण्यांना आता हटविले जाणार आहे.

असा निर्णय का घेण्यात आला?

भारताने ऑपरेशन सिंदूर राबविल्याच्या एक दिवसानंतर भारताने सदर निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानी माध्यमावर पूर्णपणे निर्बंध घातला असून कोणत्याही चुकीच्या माहितीला प्रसारित होण्यापासून अटकाव केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालायने आपल्या आदेशात म्हटले की, भारतात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायात पाकिस्तानच्या सरकारचा किंवा त्यांच्या अतिरेकी संघटनांचा थेट हस्तक्षेप राहिला आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात येत आहे. यामुळे कालपासून एकूण १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आणखी कठोर पाऊले उचलली आहेत.