Teacher Uses ChatGPT: अमेरिकेतील एका विद्यापीठातील विद्यार्थिनीने प्राध्यापक नोट्स तयार करण्यासाठी गपचूपपणे एआय टूल्सचा वापर करत असल्याचे कळल्यानंतर शिक्षण शुल्क परत करण्याची मागणी केली आहे. यावर्षी नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून पदवीधर झालेल्या एला स्टेपलटनला तिच्या प्राध्यापकांच्या व्याख्यानांवर संशय आल्यानंतर औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या विद्यार्थीनीने तिच्या शिक्षणासाठी अंदाजे ६.८ लाख रूपये शुल्क भरले होते.
विद्यार्थीनीच्या म्हणण्यानुसार, तिला ग्रंथसूचीमध्ये “चॅटजीपीटी” उद्धरण, वारंवार झालेल्या टायपिंगच्या चुकांसह एआय निर्मितीची स्पष्ट चिन्हे दिसली. यानंतर तिने ताबडतोब वर्गातील एका मैत्रिणीला याबाबत मेसेज करून माहिती दिली होती.
विद्यार्थीनीने मैत्रिणीला केलेल्या मेसेजमध्ये लिहिले होते की, “त्यांनी कॅनव्हासवर लिहिलेल्या नोट्स तू पाहिल्या का? या नोट्ससाठी त्यांनी चॅटजीपीटीचा वापर केला आहे.” ज्यावर मैत्रिणीने उत्तर दिले, “अरे देवा, थांब. हे काय आहे?” याबाबत द न्यू यॉर्क टाईम्सने वृत्त दिले आहे.
विद्यापीठाने दावा फेटाळला
दरम्यान, विद्यार्थीनीच्या तक्रारीनंतर अनेक बैठका झाल्या. यानंतर नॉर्थईस्टर्न विद्यापीठाने विद्यार्थीनीचा दावा फेटाळून लावला आहे. परंतु, एआय नोट्समागील प्राध्यापक रिक एरोवुड यांनी कबूल केले आहे की, त्यांनी व्याख्याने लिहिण्यासाठी चॅटजीपीटी, पर्प्लेक्सिटी एआय सर्च इंजिन आणि गामा नावाच्या एआय प्रेझेंटेशन जनरेटर सारख्या एआय टूल्सचा वापर केला आहे.
एआय च्या वापराची माहिती देण्याची गरज
नॉर्थईस्टर्न विद्यापीठाच्या एआय धोरणानुसार, कोणत्याही प्राध्यापक किंवा विद्यार्थ्याने “एआयचा वापर केला असल्यास त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. २०२२ मध्ये लॉन्च झाल्यापासून, चॅटजीपीटीने जगभरातील एआय संस्कृतीत क्रांती घडवून आणली आहे. विद्यार्थी हे तंत्रज्ञानाचे सुरुवातीचे अवलंबक असले तरी, बहुतेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे किंवा त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.