ब्लू व्हेल हा जीवघेणा गेम दिवसेंदिवस आपले जाळे पसरवत असून, त्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. तमिळनाडूमधील एका १९ वर्षीय मुलाने गुरुवारी आत्महत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आत्महत्येचे कारण ब्लू व्हेल गेम आहे. या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला ५० दिवसांसाठी ५० आव्हाने दिली जातात, ज्यामध्ये शेवटचा टप्पा हा आत्महत्याच आहे.
मदुराईमधील कलाईनगर भागात विग्नेश राहतो. त्याच्या घरात आत्महत्येनंतर चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये त्याने आपले शेवटचे म्हणणे मांडले आहे. तो म्हणतो ‘ब्लू व्हेल हा गेम नाही…एकदा तुम्ही यामध्ये शिरलात तर बाहेर येण्याचा कोणताच रस्ता नाही….’ याशिवाय त्याच्या हातावर ब्लू व्हेल माशाचा आकार कोरला असून, त्याखाली ब्लू व्हेल असे लिहिलेही आहे. विग्नेश बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. या गेममुळे होणारी हा तमिळनाडूमधील पहिला मृत्यू आहे.




याआधीही देशातील दोन मुलांनी या गेमच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य संपवलं होते. मागील महिन्यात मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने अशाचप्रकारे आत्महत्या केली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या आनंदपूरमध्ये राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यानं ब्लू व्हेल गेम खेळाचे टप्पे पार करत आत्महत्या केल्याची भीती वर्तविण्यात येते होती. ब्लू व्हेल या खेळामुळे चीनमध्ये आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. रशियातून या खेळाचं लोण जगभरात पसरताना दिसतं आहे. रशियात या गेममुळे २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. १२ ते १६ या वयोगटातील मुलांकडे असलेल्या स्मार्टफोनमध्ये हा गेम डाऊनलोड करण्याचं प्रमाण आणि या गेममुळे त्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण जास्त आहे. काही राज्यांमध्ये या गेमवर बंदी आणण्यात आली आहे. मात्र अजूनही त्यामुळे आत्महत्या होत असल्याचे दिसत आहे.