पीटीआय, ढाका

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने गुरुवारी अधिक हिंसक वळण घेतले. राजधानी ढाक्यात झालेल्या हिंसाचारात गुरुवारी १८ जणांचा मृत्यू झाला असून अडीच हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. आंदोलकांनी दूरचित्रवाणी केंद्राला वेढा दिला असून काही पत्रकारांसह तेथील कर्मचारी आतमध्ये अडकल्याची माहिती आहे.

देशाच्या आरक्षण प्रणालीमध्ये मुलभूत बदल करण्याची मागणी करत गेल्या आठवडाभरापासून ढाक्यासह विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपासून आंदोलन अधिकाधिक हिंसक होत असून गुरुवारी राजधानीच्या अनेक भागांत जाळपोळ आणि तोडफोडीला उधाण आले. आंदोलकांनी सरकारी इमारती तसेच विद्यापीठांना लक्ष्य केले. दूरचित्रवाणी केंद्राच्या फाटकाची मोडतोड करण्यात आली, तर परिसरातील वाहनेही जमावाने पेटवून दिली. मंगळवारी हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आंदोलनातील मृतांचा आकडा २५वर गेला आहे. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी असल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हिंसाचारानंतर ढाक्यातील मेट्रो तसेच सर्व प्रमख शहरांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>बांगलादेशात आंदोलनाचा भडका;  नोकऱ्यांतील आरक्षण हटविण्याची मागणी, हिंसाचारात १८ ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलकांची मागणी काय?

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये ५६ टक्के आरक्षण आहे. यातील सर्वाधिक ३० टक्के आरक्षण हे १९७१च्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या ‘मुक्तिवाहिनी’ आंदोलकांच्या वारसदारांना देण्यात आले आहे. नोकऱ्यांमधील आरक्षण हटविण्याची आंदोलक मागणी करीत आहेत. तर सध्या हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तेथील निकालाची प्रतीक्षा करावी, असे शेख हसिना यांच्या सरकारचे म्हणणे आहे.