अफगाणिस्तानमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. सरकारी लष्करी दल आणि बंडखोर तालिबानमध्ये आता काबूलसाठी युद्ध सुरु आहे. शुक्रवारी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये मुसंडी मारुन दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतली आहे. दरम्यान या घडामोडींनंतर तालिबानने भारतालाही अफगाणिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न केल्यास वाईट परिणाम होईल असा धमकी वजा इशारा दिलाय. मात्र यावरुन आता भाजपाच्याच एका खासदाराने पंतप्रधान मोदींचे विश्वासू सहकारी म्हणजेच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधलाय.
भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या दोन महत्वाच्या व्यक्तींवर ट्विटरवरुन निशाणा साधलाय. “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अडचणीत आणणारे जयशंकर आणि डोवाल हे दोघे कधीतरी देशाची माफी मागतील का? मोदी समवयस्क राजकारण्यांवर विश्वास न ठेवता अशा राजकारण्यांवर विश्वास ठेवत असल्याने त्यांना मुक्तपणे निर्णय घेण्याची सूट देण्यात आलेली. आता आपण (त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे) आपल्या सर्व शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडवून बसलोय,” असा टोला स्वामींनी लगावलाय.
नक्की वाचा >> अफगाणिस्तान संघर्ष : भारताला मित्र मानता की शत्रू?; तालिबानने स्पष्ट केली भूमिका
Will the bureaucrat duo Jaishankar and Doval ever apologise to the nation for the mess they have landed India in the international scene? They were given a free hand because Modi trusts politicians not peer level politicians. Now we in a mess with all our neighbours.
— Subramanian Swamy (@Swamy39) August 14, 2021
भारताला धमकीवजा इशारा…
कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेनं तालिबानचा कतारमधील दोहा येथील कार्यालयातील प्रवक्ता मोहम्मद सोहिल साहीनने केलेल्या चर्चेत भारताला धमकावले आहे. भारताने अफगाणिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करु नये असा इशाराच तालिबानने दिला आहे. “जर ते अफगाणिस्तान लष्कराच्या मदतीला आले किंवा त्यांनी इथे आपली उपस्थिती दाखवली तर त्यांच्यासाठी (भारतासाठी) हे चांगलं ठरणार नाही. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये इतर देशांनी सैन्य पाठवलं तेव्हा काय घडलं हे पाहिलं आहे. हे सर्व प्रकरण त्यांच्यासाठी एखाद्या खुल्या पुस्तकाइतकं स्पष्ट आहे,” असं साहीन म्हणाला आहे.
If they (India) come to Afghanistan militarily & have their presence, I think that will not be good for them. They’ve seen the fate of military presence in Afghanistan of other countries, so it is an open book for them: Taliban Spokesperson Muhammed Suhail Shaheen to ANI pic.twitter.com/zIw8vrxHED
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ANI (@ANI) August 14, 2021
पुढे बोलताना साहीनने भारताने अफगाणिस्तानला केलेल्या मदतीसंदर्भात भाष्य केलं आहे. “त्यांनी (भारताने) अफगाणिस्तानमधील लोकांना आणि देशातील राष्ट्रीय प्रकल्पांना मदत केली आहे. त्यांनी यापूर्वीही मदत केलीय. त्याचं आम्हाला कौतुक आहे,” असंही साहीनने तालिबानची भूमिका मांडताना म्हटलं आहे.
They (India) have been helping the Afghan people or national projects. They did it in the past. I think that is something which is appreciated: Taliban Spokesperson Muhammed Suhail Shaheen to ANI pic.twitter.com/CF0xhQigda
— ANI (@ANI) August 14, 2021
हा प्रश्न तुम्ही भारत सरकारला विचारा…
साहीनने यापूर्वीच एनडीटीव्हीशी संवाद साधला. त्यावेळी भारताला तुम्ही मित्र मानता की शत्रू?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना प्रवक्ते मोहम्मद सोहिल साहीनने हे तुम्ही तुमच्या सरकारलाच विचारलं पाहिजे असं म्हटलं आहे. “तुम्ही हे तुमच्या सरकारला विचारलं पाहिजे की ते तालिबानला मित्र मानतात की शत्रू. जर भारत अफगाणिस्तानमधील जनतेला आमच्याविरोधात लढण्यासाठी बंदूका, शस्त्र आणि स्फोटके पुरवत असेल तर आम्ही याकडे वैर भावनेतून केलेली कारवाई अशा दृष्टीकोनातूनच पाहू. मात्र भारताने अफगाणिस्तानमधील शांतता आणि भरभराटीसाठी काम केलं त्याला आम्ही वैर भावना म्हणणार नाही. काय ते भारताने ठरवावं,” असं प्रवक्त्याने सांगितलं.
भारताची तालिबानशी चर्चा सुरु आहे का या प्रश्नावरही साहीनने उत्तर दिलं. “होय, आम्ही पण बातम्या ऐकल्या की भारतीय अधिकारी दोहा आणि इतर ठिकाणी तालिबानशी चर्चा करत आहेत. मात्र याची खात्रीशीर माहिती माझ्याकडे नाही. मात्र मी ठामपणे हे सांगू शकतो की काल झालेल्या एका बैठीला भारतीय अधिकारी आणि तालिबानी प्रतिनिधी उपस्थित होते,” असं प्रवक्ता म्हणाला.
दहशतवाद्यांना मदत करणार…
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यास आमच्या देशामधून आम्ही आयएसआयएस आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांना काम करण्यास परवानगी देऊ, असंही तालिबानने स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याचा दावा प्रवक्त्याने फेटाळून लावला. “तुम्ही म्हणता आम्हाला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. मात्र माझ्यामते तुम्ही असं म्हणत आहात कारण तुमचे पाकिस्तानशी वैर आहे. तुम्ही हा दावा अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहून केलेला नाहीय,” असं प्रवक्त्यांनी सांगितलं.
तालिबानची विचारसरणी काय?
१९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवणाऱ्या तालिबानला अमेरिकेने जवळजवळ संपवलं होतं. इस्लामिक कायद्यानुसार तालिबान कारभार करतं. यामध्ये महिलांना कामाची तसेच शिक्षणाची परवानगी नसते. पुरुष नातेवाईक सोबत असेपर्यंत महिला एकटी घराबाहेर पडू शकत नाही. पुरुषांनी दाढी वाढवून डोक्यावर गोलाकार टोपी घालणं बंधनकारक असतं. मनोरंजनाची साधने वापरण्यावर बंदी असते. याचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा केली जाते. अमेरिकेने दणका दिल्यानंतर तालिबान्यांनी पाकिस्तानचा आश्रय घेतल्याचं सांगण्यात येतं.