देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. रोज साडेतीन लाखांहून अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. असं असतानाच आता थेट भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला घरचा आहेर दिलाय. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या करोना माहमारीच्या काळामध्ये काहीच कामाचं नसून सध्याची करोना परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केलीय. स्वामी यांनी सध्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचं काम मोकळेपणाने करु दिलं जात नसल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या करोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच अन्य एका ट्विटमध्ये मी पंतप्रधान कार्यालयासंदर्भात भाष्य केलं असून तो एक विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावं, असंही स्वामींनी म्हटलं आहे. स्वामी यांच्या या ट्विटवर सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्ष वर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिलं. “नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिलं जात नाही. मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,” अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केलीय.

गडकरीच का असा प्रश्न एकाने विचारला असता स्वामींनी, “करोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवलंय”, असं सांगितलं.

गडकरींकडे करोनाविरुद्धच्या मोहिमेचा सर्व कारभार द्यावा या स्वामींच्या मागणीला अनेकांनी सहमती दर्शवल्याचं ट्विटरवर पहायला मिळत आहे. गडकरी हा शब्द ट्विटरवर ट्रेण्ड होत असून स्वामींनी सुचवलेला पर्याय अगदीच योग्य असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. लेखक आणि अभिनेत्या असणाऱ्या सुशील सेठ यांनीही गडकरींना या कामासाठी नियुक्त केलं पाहिजे अशी मागणी करणारं ट्विट केलं आहे.

सध्या नितीन गडकरी हे केंद्रातील मोदी सरकारमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subramanian swamy wants conduct of this war delegated to nitin gadkari says harsh vardhan will bloom scsg
First published on: 05-05-2021 at 08:13 IST