Markandey katju Reaction On CJI BR Gavai Attack: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका वकिलाने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी न्यायाधीशांनी न्यायालयात कमी बोलावे, असा सल्ला दिला आहे.

इंडिका न्यूजसाठी लिहिलेल्या लेखात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी या कृत्याचा निषेध केला, परंतु असे म्हटले की अशा घटना अनेकदा न्यायालयीन कामकाजाच्या दरम्यान केलेल्या अनावश्यक टिप्पण्यांमुळे घडतात. “सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकल्याच्या घटनेचा मी निषेध करतो. परंतु त्याच वेळी, मी हेही सांगू इच्छितो की न्यायाधीशांनी न्यायालयात जास्त बोलल्यानेच अशा घटना घडतात”, असे त्यांनी लेखात लिहिले आहे.

खजुराहो येथील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जीर्णोद्धारासाठीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी याचिकाकर्त्याला म्हटले होते की, “जा आणि देवालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात, मग जा आणि प्रार्थना करा.”

इंग्लंडचे माजी लॉर्ड चान्सलर सर फ्रान्सिस बेकन यांच्या हवाल्याने काटजू यांनी लिहिले की, “जास्त बोलणारा न्यायाधीश हा एका बेसूर झांजासारखा असतो. न्यायाधीशांचे काम न्यायालयात बोलणे नव्हे, तर ऐकणे आणि नंतर त्यांना जे योग्य वाटेल ते ठरवणे आहे”, असे ते म्हणाले.

ब्रिटिश न्यायालयाला भेट देण्याचा अनुभव सांगताना काटजू म्हणाले, “तिथे जवळजवळ पूर्णपणे शांतता होती. न्यायाधीश शांतपणे ऐकत होते आणि वकील अतिशय शांतपणे युक्तिवाद करत होते. कधी कधी, न्यायाधीश काही मुद्दा स्पष्ट करण्यासाठी वकिलाला प्रश्न विचारत असत, अन्यथा ते संपूर्ण दिवस शांत असायचे. न्यायालयाचे वातावरण असेच शांत असावे.”

दरम्यान, वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या त्यांच्या कृतीचे समर्थन केले आणि मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जिर्णोद्धार करण्याच्या मागणीच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या टिप्पणीमुळे ते दुखावले असल्याचे म्हटले.

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर केलेल्या हल्ल्याबाबत बोलताना वकील राकेश किशोर यांनी त्यांना या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नसल्याचे म्हटले आहे. “हे मी केले नाही, हे देवाने केले आहे. भारताच्या सरन्यायाधीशांनी सनातन धर्माची थट्टा केली. हा देवाचा आदेश होता, कृतीची प्रतिक्रिया होती”, असे ते म्हणाले.