संयुक्त अरब अमिरातीमधील एका कार्यक्रमामधून भारतीय पत्रकार सुधीर चौधीर यांना वगळण्यात आलं आहे. देशाच्या राजकुमारी असणाऱ्या हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी रविवारी सोशल नेटवर्किंगवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. राजकुमारी यांनी स्वत: शनिवारी सुधीर चौधरी यांना संयुक्त अरब अमिरातीमधील कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून बोलवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतलेला. सुधीर चौधरी हे वादग्रस्त व्यक्तीमत्व असून ते असहिष्णु दहशतवादी आहेत, अशा शब्दांमध्ये राजकुमारीने टीका केलेली.
राजकुमारी यांनी ट्विटरवरुन सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, “सुधीर चौधरी यांना आबू-धाबी चार्टर्ड अकाऊंट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील वक्ता म्हणून वगळण्यात आलं आहे.” राजकुमारींनी आपल्या ट्विटमध्ये एक पत्रही लिहिलं असून ते आयसीएआयच्या आबू-धाबीमधील शाखेच्या सदस्यांनी लिहिलं आहे. या पत्रामध्ये चौधरी यांना वक्ता म्हणून बोलवण्यावर आक्षेप घेण्यात आलाय. चौधरी हे प्रसिद्धी टीव्ही अँकर असले तरी त्यांच्याविरोधात खंडणी मागण्यापासून ते अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचा उल्लेख पत्रात आहे.




अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी युएईमध्ये कोणत्याही धर्म किंवा वंशाला द्वेषपूर्ण भाषणाच्या माध्यमातून लक्ष्य करणे कायद्याने गुन्हा असल्याची माहिती दिली.
राजकुमारी हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी एका टीव्ही कार्यक्रमामधील चर्चेदरम्यान ‘इस्लामबद्दल भिती निर्माण करण्याच्या मानसिकतेला पाठिंबा देणाऱ्या वृत्तवाहिनीचे न्यूज अँकर सुधीर चौधरी’ यांना दुबईमधील कार्यक्रमात आमंत्रित करण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यासारख्या लोकांमुळे भारतामध्ये मुस्लीमांवर अन्याय होत आहेत. असं असताना आपण आपल्या देशामध्ये यांना आमंत्रित करावं का असा प्रश्नही राजकुमारींनी यापूर्वी ट्विटरवरुन या कार्यक्रमाच्या जाहिरातीचं कात्रण शेअर करत विचारला होता.
राजकुमारींनी आयोजकांबरोबरच इंडियन चार्टर्ड अकाऊंट्स इन्स्टिटयूटवर टीका केली होती. चौधरी यांचा उल्लेख एक ‘दहशतवादी’ असा करत राजकुमारींनी हा वादग्रस्त अँकर अनेकदा इस्लाम आणि इस्लामच्या अनुयायांची बदनामी करतो, अशी आठवण आयोजकांना करुन दिलेली.