तामिळनाडूमधील वेल्लोर जिल्ह्यात राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) दिलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. चार दिवसांत राज्यातील अशी तिसरी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलीने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी NEET 2021 ची परीक्षा दिली होती, पण ती निवडली जाईल की नाही याची तिला चिंता होती. १२ वीत तिने ८४.९ टक्के गुण मिळवले होते.

मुलीचे वडील मजुरीचे काम करतात. यापुर्वी, मंगळवारी NEET दिलेल्या मुलीने तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यातील एका गावात आत्महत्या केली होती. दुसरीकडे, १९ वर्षीय धनुषने १२ सप्टेंबर रोजी परीक्षा देण्याच्या काही तास आधी आत्महत्या केली होती.

अरियालूर जिल्ह्यात आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर AIADMK ने राज्यातील सत्ताधारी DMK सरकारवर जोरदार हल्ला चढवला, तर मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी कायदेशील लढणार असल्याचे सांगितले. मुलीच्या मृत्यूनंतर काही तासांनी, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी आणि पालकांना आश्वासन दिले की, NEET रद्द करण्यासाठी कायदेशीर लढाईत कोणतीही कसर सोडली जाणार नाही.

१३ सप्टेंबरला NEET विरोधात विधानसभेत विधेयक मंजूर झाल्याचा उल्लेख करताना स्टालिन म्हणाले, “आम्ही सुरुवातीपासूनच NEET ला विरोध करत आलो आहोत, जे तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न भंग करत आहे. परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कायदेशीर संघर्ष सुरू केला आहे.”